Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर :

रात रोज वापरल्या जाणाऱ्या अगरबत्तीमधून निर्माण होणाऱ्या विषारी धुरावर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भारतीय मानक ब्यूरो (BIS) ने ‘IS 19412 : 2025’ हे नवे गुणवत्ता मानक जाहीर करत अगरबत्ती निर्मितीत वापरल्या जाणाऱ्या घातक कीटकनाशके व रसायनांवर बंदी घातली आहे.

भारत हा जगातील सर्वात मोठा अगरबत्ती उत्पादक व निर्यातदार देश असून, या निर्णयामुळे ग्राहकांच्या आरोग्याला मोठा दिलासा मिळणार आहे.

घातक रसायनांवर पूर्णतः बंदी

अनेक अगरबत्ती उत्पादक कंपन्या कीटकांपासून संरक्षणासाठी किंवा तीव्र सुगंधासाठी अलेथ्रिन, परमेथ्रिन, सायपरमेथ्रिन, डेल्टामेथ्रिन आणि फिप्रोनिल यांसारखी घातक कीटकनाशके वापरत होत्या.
या रसायनांमुळे निर्माण होणारा धूर फुफ्फुसांसाठी अत्यंत घातक असल्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध झाले आहे. नव्या मानकांनुसार अशा सर्व रसायनांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

सुरक्षित अगरबत्ती कशी ओळखाल?

नव्या नियमांनुसार उत्पादित अगरबत्तींवर ‘BIS Standard Mark’ असणे बंधनकारक असेल.
यामुळे ग्राहकांना सुरक्षित आणि आरोग्यदायी अगरबत्ती ओळखणे सोपे होणार आहे. या निर्णयामुळे घरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे.

अगरबत्तीचे तीन प्रकारांत वर्गीकरण

नव्या BIS मानकांनुसार अगरबत्तीचे वर्गीकरण तीन श्रेणींमध्ये करण्यात आले आहे –

  1. मशीननिर्मित अगरबत्ती

  2. हस्तनिर्मित अगरबत्ती

  3. पारंपरिक मसाला अगरबत्ती

या वर्गीकरणामुळे कच्चा माल, सुगंध व उत्पादन प्रक्रियेचा दर्जा राखणे सुलभ होणार आहे.

निर्यातीला चालना, उद्योगाला विश्वासार्हता

भारत सध्या दरवर्षी सुमारे १,२०० कोटी रुपयांची अगरबत्ती निर्यात करतो आणि १५० हून अधिक देशांमध्ये भारतीय अगरबत्ती पोहोचते.


नव्या मानकांमुळे ८,००० कोटी रुपयांच्या देशांतर्गत अगरबत्ती उद्योगाला जागतिक पातळीवर अधिक विश्वासार्हता मिळणार आहे.

कर्नाटक ‘अगरबत्ती हब’

कर्नाटक राज्याला भारताचे ‘अगरबत्ती हब’ मानले जाते. याशिवाय गुजरातमध्येही अनेक लघु व मध्यम उद्योग या क्षेत्रात सक्रिय आहेत.
अमेरिका, मलेशिया, नायजीरिया, ब्राझील आणि मेक्सिको हे भारतीय अगरबत्तीचे प्रमुख निर्यात बाजार आहेत.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here