अमोल शिंगे : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर जिल्ह्याजवळील आंबोली येथे कोल्हापूर येथील राजेंद्र सणगर ‘सेल्फी पॉइंट’वर उभा राहून रुमाल उडवण्याचा प्रयत्न करत त्याचा तोल गेला आणि तो सुमारे 300 फूट खोल दरीत कोसळून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर पर्यटन स्थळांवर होणाऱ्या अपघातांचा आणि हुल्लडबाजीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. असे प्रकार वारंवार का होतात? त्यामागची मानसिकता काय आहे? त्यावर काय उपाययोजना असाव्यात? याचा घेतलेला हा आढावा..
कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकित पर्यटन स्थळांवर दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे. मात्र, याचबरोबर काही ठिकाणी वाढती हुल्लडबाजी, असभ्य वर्तन आणि सार्वजनिक ठिकाणी घातले जाणारे गोंधळ स्थानिक प्रशासन आणि नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. विशेषतः राधानगरी धरण परिसर, राऊतवाडी धबधबा, गगनबावडा घाट अशा ठिकाणी पर्यटकांकडून होणारी मोठ्या आवाजात स्पीकर लावून गाणी वाजवणे, मद्यप्राशन करून आरडाओरड करणे, परिसरात घाण करणे यामुळे पर्यावरणाची हानी तर होतेच, पण स्थानिक रहिवाशांना आणि कुटुंबासह येणाऱ्या पर्यटकांनाही त्रास सहन करावा लागतो. या हुल्लडबाजीतूनच बऱ्याच पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हुल्लडबाजी बरोबरच पर्यटन स्थळांवर अपघात होण्याचं आणखी एक मोठं कारण समोर येत आहे ते म्हणजे ‘सेल्फी’ फोटो घेण्याचं वेड. या वेडापोटी कितीतरी पर्यटकांनी आपला जीव गमावला आहे. समाज माध्यमांवर प्रसिद्धी मिळावी म्हणून जिवावर उदार होऊन कसलाही धोका पत्करून ‘सेल्फी’ फोटो काढण्याची तरुणांबरोबर जवळपास सर्वच वयोगटात मानसिकता वाढत चालली आहे. याच मानसिकतेला ‘डोपामिन रिलीज’ असं म्हणतात.
आपल्या मेंदूमध्ये नैसर्गिकरित्या तयार होणारे हे एक रसायन आहे. (सायनॅप्टिक न्यूरोट्रांसमीटर) आहे. हे रसायन आपल्या शरीरातील अनेक महत्त्वाच्या कार्यांवर परिणाम करतं विशेषतः आनंद, प्रेरणा, लक्ष केंद्रित करणे आणि शिकण्याची क्षमता यांच्यावर परिणाम करतं. आपल्या मेंदूला जेव्हा एखादी गोष्ट चांगली वाटते, तेव्हा तो त्या गोष्टीशी डोपामिनचा संबंध निर्माण करतो. त्यामुळे आपल्याला ती गोष्ट पुन्हा पुन्हा करावीशी वाटते. आपल्या सेल्फीला प्रतिक्रिया, लाईक आल्या की मग पुन्हा सेल्फी काढण्याचा मोह होतो आणि त्यासाठी कोणताही धोका पत्करण्याची तयारी होते. यालाच ‘डोपामिन रिलीज’ म्हणतात. थोडक्यात काय डोपामिन हे मेंदूचं “इनाम देणारं” रसायन आहे. योग्य प्रमाणात असेल तर ते आपल्याला आनंदी, प्रेरित आणि सक्रिय ठेवतं. पण त्याचा अतिरेक हा असंतुलन निर्माण करतो. त्यामुळे सेल्फी, सोशल मीडिया किंवा कोणत्याही सवयीमागचं “डोपामिनचं गणित” ओळखणं आवश्यक आहे.
आजच्या डिजिटल युगात पर्यटन म्हणजे केवळ दृश्य सौंदर्य अनुभवणे नव्हे, तर त्या अनुभवाचे “दृश्य पुरावे” सोशल मीडियावर शेअर करणेही महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे सेल्फी हा पर्यटनाचा एक अपरिहार्य भाग बनला आहे. पण कधी कधी ही सवय जिवावर बेतते. ही झाली मानसिकता पण या सर्व प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा प्रयत्न होणं गरजेचं आहे. पर्यटन स्थळांवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जिल्हा प्रशासनाबरोबर स्थानिक प्रशासनाची सुद्धा जबाबदारी आहे. जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासन या दोघांनी मिळून लोकशाही स्थळे, दरी, घाट आणि धबधबे याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवावे लागणार आहे. त्याचबरोबर धोक्याच्या ठिकाणी “सेल्फी बंद” मोहीम कायदेशीर माध्यमातून राबवण्याची अत्यंत गरज आहे. ही जबाबदारी फक्त जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासन या दोघांचीच नाही तर पर्यटकांची सुद्धा आहे. पर्यटकांनी सुद्धा अति उत्साहाच्या भारात आशा चुका करू नयेत की त्या त्यांच्या आणि इतर पर्यटकांच्या जिवावर बेततील.



