मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) एक अभिनव उपक्रम राबवत आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले की, राज्यातील प्रमुख ७५ एसटी बसस्थानकांवर सर्वसामान्य प्रवाशांसाठी ‘मोफत वाचनालय’ सुरू करण्यात येणार आहे.
या उपक्रमाचा उद्देश प्रवाशांना प्रवासाच्या प्रतिक्षेदरम्यान माहितीपूर्ण आणि प्रेरणादायक वाचनाची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. वाचनालयांमध्ये विविध प्रकारची पुस्तके – आत्मचरित्रे, प्रेरणादायक साहित्य, विज्ञान, इतिहास आणि मराठी साहित्य यांचा समावेश असणार आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाचन संस्कृतीचे मोठे समर्थक आहेत. त्यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त त्यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे,” असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
या वाचनालयांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर यासारख्या प्रमुख शहरांतील एसटी स्थानकांचा समावेश असेल.
मंत्री सरनाईक म्हणाले की, विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विनय सहस्रबुद्धे यांच्या संकल्पनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून यंदा एसटीच्या प्रमुख ७५ बसस्थानकावर परिसरातील सर्व सामान्य नागरिकांसाठी “मोफत वाचनालय” सुरू करणारं आहोत.
या वाचनालयात मराठी भाषेतील वि.स. खांडेकर , वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज), कवी नारायण सुर्वे, पु.ल. देशपांडे, यांच्या सारख्या प्रथितयश व लोकप्रिय साहित्यिक, कवी यांची पुस्तके, कविता संग्रह, नामदेवराव ढसाळ, भालचंद्र नेमाडे,शंकर पाटील, व.पु. काळे, विश्वास पाटील, या सारख्या कादंबरीकार यांच्या कादंबऱ्या सर्वसामान्यांसाठी या वाचनालयात ठेवण्यात येतील.
ही पुस्तके संबंधित बसस्थानकावरील एसटी कर्मचाऱ्यांनाकडे नोंद करून लोक आपल्या घरी वाचनास घेऊन जाऊ शकतात व वाचन करून परत आणून देऊ शकतात. याबरोबरच महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही मौलिक संदर्भ ग्रंथ देखील या फिरत्या वाचनालयामध्ये उपलब्ध करून दिले जातील. अर्थात, ही सर्व सेवा मोफत असणार आहे. तसेच स्थानिक वृत्तपत्रे देखील दररोजच्या दररोज उपलब्ध करून दिली जातील. त्यामुळे मराठी भाषेचा समृद्ध वारसा चालवणारा ” वाचन कट्टा ” बसस्थानकाच्या परिसरात निर्माण होईल असेही मंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितले.
या उपक्रमाचे स्वागत करत अनेकांनी सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या असून, प्रवासात पुस्तकांची साथ ही आनंददायक ठरणार असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.