गोदातीरी रंगणार २६ ते २८ डिसेंबरला साहित्यिकांचा मेळा
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाद्वारे घेण्यात येणारे चौथे विश्व मराठी संमेलन २६ ते २८ डिसेंबर या कालावधीत नाशिकमध्ये होणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात गोदातीरी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सहयोगाने हे संमेलन होईल, अशी घोषणा मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी नाशिकमध्ये केली.
विश्व मराठी संमेलनात ज्येष्ठ साहित्यिकास दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम यंदापासून पाच लाखांऐवजी दहा लाख रुपये करण्यात आल्याचेही सामंत यांनी या वेळी जाहीर केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात विश्व मराठी संमेलनाच्या तयारीबाबतची पहिली बैठक सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी आमदार सीमा हिरे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकुमार देवरे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे, मराठी भाषा विभागाचे उपसचिव डॉ. नामदेव भोसले आदी उपस्थित होते. पहिली दोन संमेलने मुंबईत घेण्यात आली.
तिसरे विश्व मराठी संमेलन अलीकडेच ३१ जानेवारी ते दोन फेब्रुवारी या कालावधीत पुण्यात झाले. परदेशांमध्ये राहणारे बहुतांश मराठी भाषिक १५ डिसेंबर ते ६ जानेवारी या कालावधीत सुटीसाठी महाराष्ट्रात येत असतात. त्यांनाही या संमेलनाचा आनंद घेता यावा याकरिता यापुढे दर वर्षी डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात हे संमेलन होईल, असे उदय सामंत यांनी जाहीर केले.
———————————————————————————————-






