कुरुंदवाड : प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यात कृष्णेच्या पाण्यात झपाट्याने वाढ झाल्याने आज मंगळवारी सकाळी ९ वाजता नृसिंहवाडी श्री दत्त मंदिरात या मोसमातला चौथा दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला परिसरातील भक्त उपस्थित होते.
जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रात सुरु असलेला दमदार पाऊस, विविध धरणातून मोठ्या प्रमाणात करण्यात येत असलेला विसर्ग यामुळे शिरोळ तालूक्यातील कृष्णा- पंचगंगेच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सोमवारी रात्रीपर्यंत कृष्णेचे पाणी नृसिंहवाडी दत्त मंदिराच्या मंडपापर्यंतच होते. मात्र रात्रीतून पाणी पातळी झपाट्याने वाढ झाल्याने पाहता पाहता सकाळी ९ वाजता श्री दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा पार पडला.
गेल्या दोन दिवसापासून कोयना, वारणा, राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. धरणपाणलोट क्षेत्रात सातत्याने अतिवृष्टी होत असल्यामुळे धरण पाणी साठ्यात वाढ होत आहे. यामुळे धरणांची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना व वारणा धरणातून दिवसातून दोन ते तीन वेळा विसर्गामध्ये वाढ करण्यात येत आहे. या दोन्ही धरणांचे पाणी पुढे येऊन शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीत मिसळते. यामुळे तालुक्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
दरम्यान आज मंगळवारीही धरणपाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत आहे. यामुळे कोयना धरणातून सकाळी ८ वाजता सुरु असलेल्या विसर्गामध्ये ११ वाजल्यापासून पुन्हा वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी ११ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ८ फुटावरुन ९ फुटापर्यंत उघडले गेले आहेत. आता यातून एकूण ६७,७०० क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. तर वारणा धरणातूनही सकाळी सुरु असलेल्या विसर्गामध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी वारणा धरणाच्या वक्र दरवाज्यातून सुरु असलेल्या २३,००० विसर्गामध्ये १० वाजता वाढ करुन तो एकूण २९,९८५ क्युसेक करण्यात आला आहे.
धरणपाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्यास परिस्थितीनुसार विसर्गामध्ये आणखी वाढ होणार असल्याचे संकेत धरण प्रशासनाने दिले आहेत. विविध धरणातून सुरु असलेल्या विसर्गामुळे नंद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होणार आहे. यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान आज विविध धरणातील वाढविलेल्या विसर्गाचे पाणी शिरोळ तालुक्यात सांयकाळपर्यंत पोहचेल.यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत आणखी वाढ होऊ शकते.