कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
महाराष्ट्रात पंचवीस हजार वर्षांपूर्वी लुप्त झालेल्या हत्तीचे जीवाश्म सापडले आहेत. हे अवशेष पाहून जगभरातील संशोधक अचंबित झाले आहेत. स्टेगोडॉन हत्तीचे हे जीवाश्म जीवसृष्टीची अनेक रहस्य उलगडण्यास मदत करतील असा अभ्यासकांचा दावा आहे.
चंद्रपूर तालुक्यात वर्धा-पैनगंगा नदीच्या पात्रात २५ हजार वर्षांपूर्वीचे लुप्त झालेल्या दुर्मिळ स्टेगोडॉन हत्तीचे जीवाश्म सापडलेत. महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारची प्लेईस्टोसीन काळातील हत्तीचे जीवाश्म आढळून आले आहेत. यासोबत पाषाणयुगीन अवजारेही सापडली आहेत.
विदर्भातील ही शोधलेली जीवाश्मे २३ ते २६ हजार वर्षांपूर्वीच्या स्टेगोडॉन गणेश हत्तींची असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. हत्तींचे दात, डोक्याची कवटी, मांडी व छातीची हाडे यांचा यात समावेश आहे. हा ऐतिहासिक शोध प्लेईस्टोसीन काळातील जीवाश्म अभ्यासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
या पूर्वी चंद्रपुरमध्ये डायनासोरचा पूर्ण सांगाडा सापडला होता. सिरोंचा तालुका हा प्राणहीता आणि गोदावरी नद्यांचे अस्तित्व असलेला ऐतिहासिक तालुका आहे. आणि याच भागात जैवविविधतेसाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी आढळून येतात. १९५९ मध्ये कोत्तापल्ली गावात उत्खननाच्यावेळी ‘सारापोट’ प्रकारातील डायनासोरचा पूर्ण सांगाडा सापडला होता. त्यानंतर सतत देश- विदेशातल्या संशोधकांच्या नजरा सिरोंचा तालुक्याकडे वळल्या होत्या. गेल्या चार वर्षापासून अनेक संशोधकानी या तालुक्याचा दौरा केला होता. त्यात डाॅ. धनंजय मोहबे आणि कापगते या संशोधकांचा समावेश होता.
सिरोंचाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी वाॅशिंग्टन आणि मिशीगन विद्यापीठातील जार्ज आणि जेफ या दोन संशोधकाना सोबत घेऊन सिरोंचाला आल्यावर त्यानी कोत्तापल्ली बोरगुडम भागाचा दौरा केला. त्या ठिकाणी दीड कोटी वर्ष जुने डायनासोरचे अवशेषाच्या व खुणा आढळल्या आहेत. या चमूला आपल्या भेटीत काही महत्वाचे अवशेष सापडले आहेत. त्यात लहान डायनासोरचा पाठीचा मणका आणि मानेचा भाग तसेच मोठया डायनासोरच्या पायाचे एक बोट सापडले आहे. तब्बल सत्तर ते ऐंशी डायनासोरशी संबंधीत हाडांचे अवशेष या ठिकाणी सापडले होते.
——————————————————————————————