प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
मुंबई : राज्यातील राज्यसभेच्या सात जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवार हा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीत अखेर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे. औपचारिक घोषणा लवकरच अपेक्षित आहे.
पवार यांच्या ‘एन्ट्री’मुळे राज्यसभेच्या सातही जागा बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून दुसरीकडे महायुतीही बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे.
महायुतीचे उमेदवार जाहीर
भाजपने आपल्या कोट्यातील चार उमेदवारांची घोषणा केली आहे. यात माजी मंत्री विनोद तावडे, आरपीआय (आठवले गट) प्रमुख तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, हिंगोलीचे नेते रामराव वडकुते आणि नागपूरच्या नेत्या माया इवनाते यांचा समावेश आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पार्थ पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महायुतीचे पाच उमेदवार निश्चित झाले आहेत.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात असून अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीत रस्सीखेच
महाविकास आघाडीत सातव्या जागेसाठी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार गट यांच्यात जोरदार चर्चा सुरू होती. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती. तर उद्धव ठाकरे गटाकडून प्रियंका चतुर्वेदी, राजन विचारे आणि विनायक राऊत यांची नावे पुढे आली होती.
मात्र दिल्लीतून काँग्रेस हायकमांडचा फोन आल्यानंतर अखेर शरद पवार यांच्या नावावर एकमत झाल्याचे समजते. त्यामुळे आघाडीत फूट टाळण्यात यश आले आहे.
बिनविरोध निवडणुकीची शक्यता
राज्यसभेचा एक उमेदवार निवडून येण्यासाठी ३७ मतांची आवश्यकता असते. विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीचे सहा आणि महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो.
महायुतीचे एकूण संख्याबळ २३२ इतके आहे. शिंदे गटाकडे २० मते तर अजित पवार गटाकडे अतिरिक्त मते असल्याने सातव्या जागेसाठी भाजप ताकद लावू शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती.
मात्र आता सातव्या जागेसाठी शरद पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याने आठवा उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे राज्यातील सातही जागा बिनविरोध होण्याची शक्यता बळावली आहे.






