कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
संचमान्यतेसाठी ३० सप्टेंबरची विद्यार्थी पटसंख्या ग्राह्य धरावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्यावतीने राज्याचे शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक प्राथमिक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण निरीक्षक समरजीत पाटील यांना देण्यात आले.
निवेदनात म्हंटले आहे, या वर्षीची शिक्षक संचमान्यता ३१ जुलै च्या विदयार्थी पट संख्येवर निश्चित होणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, कोल्हापूर यांच्या पत्रावरून स्पष्ट समजते. सरल पोर्टल वर विद्यार्थी नोंदणी करताना, इयत्ता पहिली मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या अनेक विध्यार्थाच्या पालकांनी आधार कार्ड काढलेले नाही, आधार केंद्रांची संख्या शहर / तालुका पातळीवर कमी आहे.
पहिलीच्या काही विद्यार्थ्यांचे हाताचे ठसे व्यवस्थित उमठत नसल्याने आधार कार्ड काढण्यास अडचणी निर्माण होत आहे,अनेक विद्यार्थ्याच्या आधार कार्डात नाव व जन्म तारीख यामध्ये स्पेलिंगच्या चुका आहेत, त्याची जलद दुरूस्ती होत नाही, परप्रांतीय विद्यार्थ्यांचे आधार कार्डवर संपूर्ण नाव नसल्यामुळे अशा विद्यार्थ्यांची नोंदणी करणे अडचणीचे ठरत आहे. महत्वाचे म्हणजे पहिलीला प्रवेश घेणारे विद्यार्थी यांचे जन्म दाखले सहा / सात वर्षापूर्वीचे असल्याने आधार कार्ड काढत असताना नवीन क्यू आर कोडचा जन्म दाखला असणे आवश्यक आहे. त्यामुळे पालकांना पुन्हा नवीन दाखला काढून त्यानंतर आधार कार्ड काढण्यासाठी वेळ लागत आहे.
या बाबींचा विचार करता आधार कार्ड काढणे व अपडेट करणे इत्यादीसाठी अधिक वेळेची आवश्यकता आहे. त्यामुळे ३१ जुलै च्या विद्यार्थी संख्येवर आधारित संच मान्यता केल्यास अनेक शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. तरी पूर्वीप्रमाणे संच मान्यता ३० सप्टेंबरच्या पटावर निश्चित करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, जिल्हा सचिव नितीन पानारी, जिल्हा कार्याध्यक्ष धीरज पारधी, शहराध्यक्ष संतोष पाटील सचिव रवींद्र नाईक, शहर कार्याध्यक्ष अभिजीत साळोखे यांचे सह कार्यकर्ते उपस्थित होते.
—————————————————————————————



