spot_img
बुधवार, सप्टेंबर 24, 2025

9049065657

Homeअध्यात्मकोल्हापुरात रंगला लोकसंस्कृतीचा जागर

कोल्हापुरात रंगला लोकसंस्कृतीचा जागर

शाही दसरा महोत्सव २०२५

कोल्हापूर  : प्रसारमाध्यम न्यूज
शाही दसरा महोत्सव – २०२५ च्या दुसऱ्या दिवशी ‘ पंचगंगा तिरी, आम्ही कोल्हापुरी ’ या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा अनोखा उलगडा झाला. पंचगंगेच्या काठावर रंगलेल्या या सोहळ्यात महाराष्ट्राची कला, शाहिरी, संगीत, नृत्य, शेतकरी नृत्य, सण-उत्सव आणि कोल्हापुरी परंपरांचा संगम पाहायला मिळाला. या कार्यक्रमाने उपस्थितांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ठेव्याचा थेट अनुभव घडवला.
डफलीच्या तालावर शाहिरीचा गजर

शाहीर रामानंद उगले यांच्या डफलीच्या तालावर शाहिरी गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. वासुदेव, भारुड, सासनकाठी नृत्य आणि मराठी सण-उत्सवांवरील गीतांनी उपस्थितांचे मन जिंकले. डफली, ढोलकी, संभाळ, डमरू, तुणतुणे यांसारख्या लोकवाद्यांच्या साथीने शाहिरी, गोंधळ, आणि जागरण यांनी महाराष्ट्राच्या परंपरेचा वारसा जागवला.

कार्यक्रमाच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराराणी, आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांना उजाळा देणारे नृत्यनाट्य सादर झाले. या नृत्यनाट्याने उपस्थितांना मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून दिली. या सांस्कृतिक सोहळ्याचे दिग्दर्शन लोककलाकार चंद्रकांत पाटील यांनी केले.
ग्रामीण पर्यटनाचा कोल्हापुरी डाव
तत्पूर्वी पर्यटन विषयक सादरीकरणात कृष्णराव बी. माळी यांनी ‘ ग्रामीण पर्यटनाचा कोल्हापुरी डाव ’ या विषयावर सादरीकरण केले. त्यांनी ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून शाश्वत रोजगार निर्मिती आणि सांस्कृतिक संवर्धनाचा मार्ग मांडला. संयमशील आणि जबाबदार पर्यटनामुळे निसर्ग आणि सामाजिक समतोल राखला जातो. शहरी धकाधकीला पर्याय म्हणून ग्रामीण कृषी पर्यटनाला चालना देणे गरजेचे आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

कोल्हापूर माझं गाव या चित्रफीतीतून शाहूवाडी तालुक्यातील गोठणे, राधानगरी तालुक्यातील आडोली, आणि गगनबावडा तालुक्यातील शेणवडे या गावांमधील ग्रामीण पर्यटनाची माहिती सादर करण्यात आली. या गावांमधील निसर्गरम्य वातावरण आणि सांस्कृतिक वैभव पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. ग्रामीण पर्यटनाला प्रोत्साहन दिल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही माळी यांनी नमूद केले.

सांस्कृतिक आणि पर्यटकीय उत्साहाचा संगम
आज झालेले कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंस्कृती आणि ग्रामीण पर्यटनाच्या संवर्धनाचा एक सुंदर मिलाफ होता. पंचगंगा तिरी, आम्ही कोल्हापुरी या मंचावर कोल्हापूरच्या सांस्कृतिक ठेव्याचा आणि ग्रामीण पर्यटनाच्या संभाव्यतेचा जागर घडला. उपस्थितांनी या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरांचा आणि निसर्गरम्य ग्रामीण जीवनाचा आनंद लुटला.
शाही दसरा महोत्सव २०२५ ने कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि पर्यटकीय वैभवाला एक नवे व्यासपीठ दिले आहे. हा सोहळा पुढील काही दिवस रंगतदार कार्यक्रमांनी कोल्हापुरी जनतेला आणि भाविकांना मंत्रमुग्ध करत राहील, यात शंका नाही!

कार्यक्रमाच्या शेवटी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते दसरा महोत्सवातील विविध कार्यक्रमातील सहभागी कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, तहसीलदार करमणूक तेजस्विनी पाटील उपस्थित होत्या.

————————————————————————————————————-
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments