प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
नवी दिल्ली, अर्थ मंत्रालयाकडून इनकम टॅक्स रूल्स २०२६ चा मसुदा तयार करण्यात आला असून, पॅन कार्डशी संबंधित पाच महत्त्वाचे बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत, हे बदल १ एप्रिल २०२६ पासून लागू होण्याची शक्यता आहे, करदाते, व्यावसायिक आणि नागरिकांकडून सूचनाही मागवण्यात आल्या आहेत.
रोख व्यवहारांवरील मर्यादा वाढणार
सध्या एका दिवसात ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम बँक खात्यात जमा करताना पॅन कार्ड देणे आवश्यक आहे, नव्या प्रस्तावानुसार आर्थिक वर्षात एकूण १० लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम रोख स्वरूपात जमा किंवा काढल्यास पॅन देणे बंधनकारक राहील, यामुळे लहान व्यवहारांसाठीची कागदपत्रांची गरज कमी होणार आहे
वाहन खरेदीसाठी नवीन नियम
दुचाकी किंवा इतर कोणतेही वाहन खरेदी करताना व्यवहाराची रक्कम ५ लाखांपेक्षा जास्त असल्यास पॅन कार्ड देणे अनिवार्य होईल, सध्या दुचाकी वगळता इतर वाहनांसाठी पॅन आवश्यक आहे, नव्या नियमामुळे व्यवहार अधिक पारदर्शक होतील
हॉटेल, रेस्तराँ व इव्हेंट बिलांवर बदल
हॉटेल, रेस्तराँ, बँक्वेट हॉल, इव्हेंट मॅनेजमेंट किंवा कन्व्हेन्शन सेंटरचे बिल १ लाखांपेक्षा जास्त असल्यास पॅन कार्ड देणे बंधनकारक असेल, सध्या ही मर्यादा ५० हजार आहे, मर्यादा वाढवल्याने कागदपत्रांचे काम कमी होईल आणि प्रक्रिया सुलभ होईल
मालमत्ता व्यवहारांसाठी वाढीव मर्यादा
मालमत्ता खरेदी, विक्री, गिफ्ट डीड किंवा विकास करारासाठी सध्या १० लाखांपेक्षा जास्त व्यवहारांसाठी पॅन आवश्यक आहे, नव्या प्रस्तावानुसार ही मर्यादा २० लाखांपर्यंत वाढवली जाईल, यामुळे मध्यम मूल्याच्या व्यवहारांना दिलासा मिळू शकतो
विमा पॉलिसीसाठी पॅन अनिवार्य होणार
विम्याचे हप्ते कितीही असले तरी विमा खाते उघडताना पॅन कार्ड देणे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव आहे, सध्या आर्थिक वर्षात ५० हजारांपेक्षा जास्त हप्ते असल्यासच पॅन मागितले जाते, नव्या नियमामुळे विमा व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढेल
अर्थ मंत्रालयातील सूत्रांनुसार, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस प्रस्तावांवर आलेल्या सूचनांचा विचार करून अंतिम निर्णय घेईल, त्यानंतर १ एप्रिल २०२६ पासून नवीन नियम लागू होतील
पॅन कार्डचे महत्त्व
पॅन कार्ड हा १० अंकी अल्फान्यूमेरिक क्रमांक असून, प्राप्तिकर विभागाकडून जारी केला जातो, करसंबंधित सर्व व्यवहारांची नोंद ठेवण्यासाठी तो आवश्यक आहे, बँक खाते उघडणे, कर भरणे, गुंतवणूक करणे, व्यवसाय नोंदणी यांसाठी पॅन कार्ड आवश्यक दस्तऐवज आहे
कोण अर्ज करू शकते
व्यक्ती, ट्रस्ट, कंपनी, संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, अल्पवयीन, ज्येष्ठ नागरिक तसेच सरकारी संस्था पॅन कार्डसाठी अर्ज करू शकतात.






