लष्करासाठी पाठवली पाच लाखांची मदत.. कोल्हापूरच्या पणदूरकर दांपत्याच्या दातृत्वाला सलाम

0
241
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

सीमेवर आपला जीव धोक्यात घालून लढणाऱ्या आपल्या जवानांचं मनोबल वाढवायचं काम कोल्हापूरच्या एका ज्येष्ठ दांपत्यानं केलंय. कोल्हापूरातलं हे वयोवृद्ध जोडपं आपल्या परीने देशसेवेचं आपलं कर्तव्य बजावतंय. शिवाजी विद्यापीठात भूगोल विभागाचे माजी प्रमुख आणि ज्येष्ठ विधीज्ञ डॉक्टर रामचंद्र पणदुरकर आणि त्यांची पत्नी हेमकिरण पणदुरकर असं या दांपत्याचं नाव. या दोघांनी मिळून भारतीय लष्कराला पाच लाख रुपयांची देणगी दिली आहे.

डॉक्टर अँडव्होकेट रूपाली पणदुरकर या त्यांच्या मुलीचं २०१४ साली आकस्मिक निधन झालं होतं. तिच्या जाण्यानं हे दांपत्य एकटं पडलं, पण त्यांनी त्या दुःखावर मात करत समाजासाठी काम करायचं ठरवलं. तेव्हापासून समाजकार्याला सुरुवात केली.

सीमेवर लढणाऱ्या जवानांचा मृत्यू, दहशतवाद्यांचे हल्ले पाहिले, की देशप्रेमाने मन अस्वस्थ होतं… अशाच एका प्रसंगातून स्फुरलेली एक भावना, कोल्हापुरातल्या एका वृद्ध मातेनं प्रत्यक्ष कृतीतून उतरवली. पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जवान शहीद झाल्याचं दृश्य पाहून व्यथित झालेल्या हेमकिरण पणदुरकर यांनी थेट संरक्षण मंत्रालयाला पाच लाखांची मदत पाठवली. आणि यातून पुन्हा एकदा कोल्हापुरच्या मातीत रुजलेल्या देशप्रेमाच्या बीजाला अंकुर फुटला.

डॉक्टर रामचंद्र पणदुरकर आणि हेमकिरण पणदुरकर हे ज्येष्ठ दांपत्य. शिवाजी विद्यापीठाचे भूगोल विभाग प्रमुख राहिलेले डॉक्टर पणदुरकर आणि विधिज्ञ हेमकिरणताई, दोघंही समाजकार्याच्या वाटेवर आहेत. त्यांच्या दिवंगत कन्या डॉक्टर अँडव्होकेट रूपाली पणदुरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांनी विविध समाजोपयोगी कार्यांची गाठ बांधली आहे.

“कमवा व शिका” योजनेखाली साकारलेली रूपाली अभ्यासिका

शिवाजी विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेअंतर्गत गरीब व होतकरू मुलींना अभ्यासाची सोय व्हावी म्हणून त्यांनी थेट साठ लाख रुपयांची देणगी दिली. त्यातून उभी राहिलेली ‘डॉ. अँडव्होकेट रूपाली पणदुरकर अभ्यासिका’ आज विद्यापीठाच्या मुलींना अभ्यासासाठी सुरक्षित आसरा ठरली आहे.

समाजसंस्थांनाही कन्येच्या नावाने देणग्या

रूपालीच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध सामाजिक संस्थांना वेळोवेळी देणग्या दिल्या जात आहेत. याशिवाय, पोस्टातील सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत अनेक लहान मुलींसाठी दरवर्षी ठराविक रक्कम भरून त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याचं काम हे दांपत्य करत आहे.

देशभक्तीचं बीज लहानपणीच रुजलेलं…

हेमकिरणताईंनी लहानपणीच देशसेवेचं बीज अनुभवलं होतं. १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या काळात, त्या फक्त १२ वर्षांच्या होत्या. तेव्हा त्यांच्या विधवा आईंनी आपलं मंगळसूत्र विकून मिळालेली रक्कम भारत सरकारला पाठवली होती. या आठवणी सांगताना हेमकिरणताईंचा स्वर भरून आला. “आईकडून शिकलंय देशप्रेम, तेच आज पुढे चालवतेय…” असं त्या नम्रपणे सांगतात.

देशसेवा ही केवळ शस्त्रांवर नाही, तर मनाच्या उमाळ्यावरही उभी असते.देश ज्यावेळी संकटात असतो अशा काळात ज्याला जे जमेल ती मदत करणं आपलं कर्तव्य असतं. पणदुरकर दांपत्याच्या कार्यातून हेच अधोरेखित होतं. 

——————————————————————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here