कोल्हापूर : प्रसारमध्यम डेस्क
एक प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक, कामगार नेते, राजकारणी, भारतीय कामगार चळवळीचे शास्त्रीय मार्गदर्शक स्वतः निवडणूक लढवून विजयी झालेले पहिले राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी (वराहगिरी वेंकट गिरी) यांचा आज- २४ जून स्मृतिदिन, यानिमित्त त्यांच्या कार्याविषयी…
वाऱहगिरी वेंकट गिरी यांचा जन्म १० ऑगस्ट १८९४ रोजी बर्हमपूर, ओडिशा (तेव्हा मद्रास प्रेसीडेंसी) येथे झाला. वडील वेंकट गिरी हेही एक समाजसुधारक होते. व्ही. व्ही. गिरी यांचे प्रारंभिक शिक्षण बर्हामपूर (सध्याचे ओडिशा राज्य) येथे झाले. उच्च शिक्षण डब्लिन विद्यापीठ, आयर्लंड (University College Dublin) येथे झाले. गिरी शिक्षण घेऊन भारतात आल्यानंतर ब्रिटिश विरोधी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. ते १९२० मध्ये काँग्रेसमध्ये सामील झाले. त्यांनी अनेकदा तुरुंगवासही भोगला.
व्ही. व्ही. गिरी कामगार हक्कांसाठी कार्य करणारे देशातील अग्रगण्य नेते होते. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (AITUC) चे गिरी अध्यक्ष होते. कामगार कायदे, पगार, कामाचे तास यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलने केली. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेत (ILO) भारताचे प्रतिनिधित्व केले. भारताचे पहिले लेबर मंत्री (स्वातंत्र्यानंतर) म्हणून त्यांनी कामगार धोरणांच्या निर्मितीत मोलाचा वाटा उचलला.
गिरी १९५२ ते १९५७ या कालावधीत काँग्रेस पक्षातर्फे लोकसभा सदस्य होते. ते उत्तर प्रदेश, केरळ व मैसूर (आजचे कर्नाटका) चे राज्यपाल होते. राज्यपालपद भोगल्यानंतर उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. झाकीर हुसेन यांचे निधन झाल्यावर काही काळ कार्यकारी राष्ट्रपती म्हणून काम पाहिले. गिरी भारतातील पहिले राष्ट्रपती होते ज्यांना काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात स्वतंत्र उमेदवार म्हणून विजयी होता आले. त्यांना पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा पाठिंबा होता, आणि यामुळे काँग्रेस पक्षात फूट पडली व “सिंडिकेट विरुद्ध इंदिरा” हा संघर्ष उभा राहिला. ही घटना भारतीय राजकारणातील एक ऐतिहासिक वळण होती. गिरी २४ ऑगस्ट १९६९ ते २४ ऑगस्ट १९७४ या काळात राष्ट्रपती होते.
राष्ट्रपती म्हणून भूमिका : त्यांनी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात संविधानिक मर्यादा पाळणारा, पण आवश्यक तेव्हा स्वतंत्र भूमिका घेणारा राष्ट्रपती म्हणून लौकिक मिळवला. त्यांनी सरकार व संसद यांच्यातील संतुलन राखताना, गरज असल्यास पंतप्रधानांशी मतभेद व्यक्त करण्यासही संकोच केला नाही.
व्ही. व्ही. गिरी कामगार आणि सामान्य माणसांच्या हक्कांसाठी झटलेला राष्ट्रपती अशीही त्यांची ओळख होती. भारताच्या संविधानाच्या चौकटीत राहून राष्ट्रपतीपदाची भूमिका भक्कमपणे बजावलेली. ते विनम्र होते. ते आदर्श सार्वजनिक जीवन जगले. त्यांनी संघटित चर्चा या तत्त्वाचा जोरदार पुरस्कार केला, जो त्या काळी भारतात फारसा रुजलेला नव्हता. भारतीय कामगार चळवळीचे शास्त्रीय मार्गदर्शक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांना १९७५ साली भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. चेन्नई- तमिळनाडू येथे व्ही. व्ही. गिरी २४ जून, १९८० रोजी त्यांचा मृत्यू झाला.
व्ही. व्ही. गिरी यांनी कामगारांच्या हक्कांसाठी शांततामय मार्गांचा पुरस्कार केला. त्यांनी भांडवलदार व कामगार यांच्यात संवाद वाढावा, वाद सामोपचाराने सुटावेत यासाठी काम केले. कामगार हितासाठी त्यांनी केलेले कार्य हेच त्यांच्या कारकीर्दीतील सर्वात प्रभावी योगदान होते. त्यांनी भारतीय कामगार चळवळीत जे योगदान दिले, ते आजही श्रमिक हक्कांच्या इतिहासात महत्त्वाचे मानले जाते.