मुंबई : विशेष प्रतिनिधी
राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आज पार पडला आहे. राज्य शिक्षण संचालनालयाने अकरावीच्या प्रवेशासाठीची पहिली गुणवत्ता यादी ( First Merit List ) आजच, म्हणजेच २८ जून रोजीच जाहीर केली आहे. विशेष म्हणजे ही यादी ३० जून रोजी प्रसिद्ध होणार असल्याचे आधी सांगण्यात आले होते. मात्र, संगणकीय प्रणालीतील तांत्रिक स्थिरता व पारदर्शकतेच्या दृष्टीने सर्व प्रक्रिया पूर्ण करून यादी दोन दिवस आधीच जाहीर करण्यात आली.
दहावीचा निकाल लागून दीड महिना उलटून गेल्यानंतरही विद्यार्थी व पालक प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत होते. यंदा तब्बल १२ लाख ७१ हजार विद्यार्थ्यांनी अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यामुळे ही पहिली यादी जाहीर होताच विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
प्रवेशाची अंतिम मुदत : १ ते ७ जुलै
या पहिल्या यादीमध्ये ज्यांना कॉलेज मिळाले आहे, त्या विद्यार्थ्यांनी १ जुलै ते ७ जुलै २०२५ या कालावधीत संबंधित कॉलेजमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे. दिलेल्या मुदतीनंतर प्रवेशासाठी पात्रता राहणार नाही.
विद्यार्थ्यांनी आपली प्रवेश स्थिती तपासण्यासाठी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. या वेबसाईटवर विद्यार्थ्यांचे नाव, गुण, कॉलेज पसंती व इतर माहिती तपासता येईल.
राज्य शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील फेर यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे ज्यांना पहिल्या यादीत प्रवेश मिळाला नाही त्यांनी चिंता न करता पुढील टप्प्यांसाठी सज्ज राहावे.
—————————————————————————————–