कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
स्वयंसिद्धा आणि प्रसार माध्यम यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर मध्ये प्रथमच मराठी कंटेंट लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. लेखनकलेतून रोजगार आणि स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवू इच्छिणाऱ्या महिलांसाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरली.
स्व. कांचनताई परुळेकर यांच्या ‘स्वयंसिद्धा’ संस्थेच्या प्रेरणेने, डिजिटल युगातील नव्या संधी समजावून देण्याचा आणि लेखनाची दिशा ठरवण्याचा प्रयत्न या कार्यशाळेतून झाला. लेखन हे केवळ अभिव्यक्तीचं माध्यम न राहता, अर्थार्जनाचे साधन ठरू शकते, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे – मराठी साहित्याच्या प्रवासाचा आढावा घेत आशयसमृद्ध लेखनाच्या संधींबाबत मार्गदर्शन केले.
डिजिटल माध्यमातील तज्ज्ञ आलोक जत्राटकर – सोशल मीडियावर लेखनाची सुरुवात कशी करावी, काय टाळावं, आणि त्याचा प्रभाव कसा वाढवता येतो यावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात डॉ. राजेंद्र पारीजात – “मराठी कंटेंट लेखन म्हणजे काय ?” याचे विश्लेषण करत ब्लॉग, वेब पोर्टल्स, सोशल मीडियावर मराठी भाषेची वाढती मागणी आणि त्यातील संधी स्पष्ट केल्या.
प्रसारमाध्यम समूहाचे संचालक प्रताप पाटील – दैनंदिन जीवनातील प्रसंगातून लेखन साकारताना वाचकांशी जोडणाऱ्या तंत्राची माहिती दिली.
या कार्यशाळेत पाॅडकास्ट, युट्यूब, वेब पोर्टल्स, ब्लॉग अशा नवमाध्यमांमधील संधी, त्याचा वापर, आणि सर्जनशीलतेला दिशा देणाऱ्या पद्धती यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी संचालिका जयश्री गायकवाड होत्या, तर संस्थेच्या विश्वस्त सौ. तृप्ती पुरेकर यांनी विशेष उपस्थिती लाभवली. सूत्रसंचालन प्रीती बांगडी यांनी केले.
‘स्वयंसिद्धा’च्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यशाळेला महिलांसह युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लेखन क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्यांसाठी हा उपक्रम एक दिशादर्शक ठरला.
—————————————————————————————–