मुंबई : प्रसारमाध्यम न्यूज
शेतकरी विस्तार सेवांची परिणामकारकता वाढविण्यासाठी आणि कृषी विषयक ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने शेती क्षेत्रात एआयचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता सर्वसमावेशक शेती शाळा आणि शिक्षण व्यवस्थापन प्रणाली ॲप विकसित करण्यास सरकारने मान्यता दिली. उसासह अन्य पिके आणि पशुसंवर्धनासाठीही याचा वापर केला जाणार आहे.
शेतक-यांना पीक व्यवस्थापनाबाबत, यंत्र अवजारांबाबत, शेतक-यांच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासांठी एकात्मिक अभियान प्रणाली आणि प्रत्येक पिकासाठी तयार केलेल्या प्रमाण कार्यपद्धतीबाबत निर्णय घेण्यास हे ॲप मदत करेल. तसेच डिजिटल शेतीशाळा, पाणीशाळा, पशुशाला यांच्या माध्यमातून मृदा आरोग्य, जलव्यवस्थापन आणि पशुसंवर्धन यांच्याशी निगडीत शैक्षणिक संसाधनांचीही माहिती देईल. या ॲपची विस्तार या केंद्र सरकारच्या अद्ययावत आणि विद्यमान संरचनांशी सांगड घातली जाणार आहे. व्यक्तिगत पातळीवर अधिक ज्ञान मिळविण्यासाठी कृत्रीम बुद्धिमत्ता, यांत्रिक शिक्षण तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाईल. या ॲप द्वारे केवळ पीक उत्पादनच नव्हे तर काढणी पश्चात प्रक्रियेसंदर्भातही माहिती दिली जाणार असल्याचे राज्य शासनाचे म्हणणे आहे. या ॲपचा पहिला टप्पा मे महिन्यापर्यंत सुरू करण्यात येणार आहे. तर शिक्षण व्यवस्थापन प्रणालीचा टप्पा सप्टेंबर महिन्यापर्यंत सुरू करण्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
ॲपची अशी घेता येईल मदत :
- प्रत्यक्ष शेतीशाळा भेट आणि प्रत्येक पिकासाठी विस्तार यंत्रणेतील कर्मचा-यांसाठी निर्णय घेण्यास मदत प्रणाली
- शेतक-यांसाठी अभिप्राय प्रणाली, यामध्ये शिक्षण मापनप्रणाली आणि सामूदायिक विषय निर्मिती यांचा समावेश असेल. जेणेकरून प्रत्येक शेती शाळेद्वारे दिलेले शिक्षण आणि त्याची उपयुक्तता नोंदवता येईल.
- पीक हंगामात प्रत्येक पिकासाठी निश्चित केलेल्या प्रमाण कार्यपद्धतीनुसार सूचनांद्वारे शेतक-यांना मदत करणे
- शेतीशाळा, पाणीशाळा आणि पशुशाळा प्रसारित करण्याचे माध्यम
- विस्तार नेटवर्कमधील ज्ञानाचा फायदा
- कृषी प्रकिया आणि विपणनासह काढणीपश्चात मूल्यसाखळीसंदर्भात शिक्षण साहित्य उपलब्ध करून देणे.