कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
बऱ्याच घडामोडी नंतर अरुण डोंगळे यांनी गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचा अखेर राजीनामा दिला. मंगळवारी सकाळी अकरा वाजता त्यांनी आपला राजीनामा पत्र स्वरूपात ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्याकडे सादर केला. तत्पूर्वी, पाटील यांनी राजीनाम्याचे पत्र कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांच्याकडे सुपूर्त केले.
गुरुवारी, दिनांक २२ मे रोजी गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, या बैठकीत डोंगळे यांचा राजीनामा औपचारिकरीत्या मंजूर केला जाणार आहे. डोंगळे यांच्या राजीनाम्यामुळे संघाच्या आगामी नेतृत्वावर आणि धोरणांवर नव्याने विचारमंथन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गोकुळ संघाच्या पुढील वाटचालीसाठी ही बैठक निर्णायक ठरणार असून, नव्या नेतृत्वाच्या निवडीकडे संपूर्ण दूध उत्पादक शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.
हसन मुश्रीफांनी मोडले डोंगळे यांचे बंड –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे करत अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. त्यावरुन, गेली सात दिवस वादळ उठले होते. रविवारी, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सोबत झालेल्या बैठकीत मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन राजीनामा देण्याची सूचना केली होती. त्यानुसार डोंगळे सोमवारी दुपारीच मुंबईकडे रवाना झाले.मंत्री मुश्रीफ यांनी डोंगळे यांचे बंड मोडून काढत असतानाच इतर सहकारी संस्थांतील पदाधिकाऱ्यांना एक प्रकारे इशारा दिल्याची चर्चा सहकारात सुरु आहे.
अरुण डोंगळे यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना संघाच्या कार्यक्षमता आणि विस्तारामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वात संघाने अनेक नवकल्पना राबविल्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी धोरणात्मक निर्णय घेतले. त्यांच्या या राजीनाम्यामुळे संघाच्या आगामी अध्यक्षपदासाठी नवे नाव समोर येण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
————————————————————————————






