मुंबई : विशेष प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील पुल कोसळून झालेले मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत. कुंडमळा येथे पावसाळ्यात शेकडो पर्यटक येतात याची माहीत असताना तो धोकादायक पुल खुला का ठेवला ? असा प्रश्न विचारून हे सरकारने घेतलेले बळी आहेत, जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ – कुंडमळा येथील लोखंडी पूल कमकुवत झाला होता, त्याच्यासाठी वर्षभरापूर्वी निधीही मंजूर केल्याचे सरकार सांगत आहे. मग वर्षभर काम का झाले नाही ? सरकार दुर्घटना होण्याची वाट पहात बसले होते का ? त्या पुलावर ‘पाटी’ लावली होती असे प्रशासन सांगत आहे. पण अशा पाट्या लावून ‘पाट्या’ टाकण्याचेच काम शासन व प्रशासन करत आहे. ५५ पर्यटक वाहून गेले, त्यातील अनेकांना वाचवण्यात आले, पण चार जण ठार झाले तर सहा गंभीर जखमी झाले, याला जबाबदार कोण ? मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये दिले म्हणजे सरकारची जबबादारी संपत नाही. जोपर्यंत कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत कोणीही गांभिर्याने घेणार नाही व अशा दुर्घटना होऊन निष्पाप लोक मात्र मरत राहतील.
पुल दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे निर्देश दिले आहेत. हा प्रकार म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ असा आहे. दुर्घटना होतात, लोक मरतात आणि सरकार काही पैसे तोंडावर फेकून ‘ये रे माझ्या मागल्या’ सारखे पुन्हा तेच होत रहाते, हे दुष्टचक्र थांबले पाहिजे, असेही सपकाळ म्हणाले..
राजकोटवरील शिवरायांच्या पुतळ्यात पुन्हा भ्रष्टाचार..
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याच्या चबुतऱ्याला मोठे भगदाड पडले आहे. निकृष्ट बांधकामामुळेच हे भगदाड पडले आहे. ११ मे रोजी या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. अवघ्या महिन्याभरातच भगदाड पडत असेल तर त्या बांधकामाचा दर्जा काय असेल, हे यावरून दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर २०२४ मध्ये महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. त्या कामातील प्रचंड भ्रष्टाचार झाल्यानेच तो पुतळा आठ महिन्यांतच पडला होता. राज्यभरातील जनतेने प्रचंड संताप व्यक्त केल्यानंतर हा नवा पुतळा उभारला होता. पण या कामातही भ्रष्टाचार झाल्याने पुतळ्याच्या चबुतऱ्याला भगदाड पडले आहे. महाभ्रष्ट महायुतीने महापुरुषांच्या पुतळ्यालाही भ्रष्टाचाराची कीड लावली आहे असेच यावरून स्पष्ट होते, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
————————————————————————————————