प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
इराण आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावाचा मोठा परिणाम खाडी देशांवर दिसू लागला आहे, दुबईसह अनेक देशांमध्ये अन्नपुरवठ्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुबईमध्ये केवळ सुमारे १० दिवस पुरेल इतकाच अन्नसाठा शिल्लक असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या या हल्ल्यानंतर इराणने खाडी परिसरातील अमेरिकन लष्करी तळांवर प्रतिहल्ले सुरू केल्याचे सांगितले जात आहे. याचा परिणाम थेट खाडी देशांवर झाला आहे.
इराणने हर्मुजची सामुद्रधुनी व्यापारी जहाजांसाठी बंद केल्याचेही सांगितले जात आहे. या मार्गानेच खाडी देशांमध्ये मोठ्या प्रमाणात अन्नधान्य, फळे, भाज्या आणि इतर आवश्यक वस्तूंची आयात केली जाते. हा मार्ग बंद झाल्याने पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला आहे.
दुबईमधील जेबेल अली बंदरावर हल्ला झाल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. त्यामुळे भाज्या, दुग्धजन्य पदार्थ आणि ताजी फळे यांची आवक थांबली असल्याचे सांगितले जात आहे. अनेक सुपरमार्केट आणि मॉलमध्ये भाज्या, दूध आणि फळांचा तुटवडा जाणवत असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.
या संघर्षाचा परिणाम केवळ दुबईपुरता मर्यादित नसून, सौदी अरेबिया, कतार आणि कुवेतसारख्या खाडी देशांनाही त्याचा फटका बसत आहे. तेल आणि गॅस वाहतुकीवरही परिणाम झाला असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या परिस्थिती तणावपूर्ण असून, या संघर्षाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि ऊर्जा पुरवठ्यावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






