नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
वाहनचालकांसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) कडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. खासगी कार, जीप, व्हॅन यांसारख्या वाहनांसाठी फास्टॅग वार्षिक पास सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, हा उपक्रम १५ ऑगस्ट २०२५ पासून लागू होणार आहे. यामुळे वाहन धारकांना वारंवार फास्टॅग रिचार्ज करण्याच्या त्रासातून सुटका मिळणार आहे.
एकदाच रिचार्ज, वर्षभर बचत
सध्या २०० टोल क्रॉस करण्यासाठी सुमारे ₹ १०,००० खर्च येतो, परंतु नव्या योजनेनुसार प्रत्येक टोल क्रॉससाठी फक्त ₹ १५ आकारले जातील. त्यामुळे वार्षिक पाससाठी केवळ ₹ ३,००० मध्ये वर्षभर प्रवासाची सोय उपलब्ध होईल. नियमितपणे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांसाठी ही योजना अधिक फायदेशीर ठरणार आहे.
कोणत्या मार्गांवर लागू ?
हा वार्षिक पास फक्त NHAI आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय (MoRTH) च्या अखत्यारीतील राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरच लागू राहील. त्यामध्ये प्रमुख मार्गांचा समावेश
-
मुंबई–रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग
-
दिल्ली–मुंबई एक्सप्रेसवे
-
मुंबई–नाशिक महामार्ग
-
मुंबई–सुरत मार्ग
मात्र, राज्य महामार्ग किंवा महापालिकेच्या टोल मार्गांवर ( उदा. मुंबई–पुणे एक्सप्रेसवे, मुंबई–नागपूर समृद्धी महामार्ग, अटल सेतू ) हा पास लागू होणार नाही. अशा मार्गांवर फास्टॅग नेहमीप्रमाणे टोल शुल्क आकारले जाईल.
फास्टॅग वार्षिक पास कसा काढाल ?
-
राजमार्ग यात्रा अॅप किंवा NHAI/MoRTH च्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
-
वाहन क्रमांक आणि फास्टॅग आयडीने लॉगिन करा.
-
₹ ३,००० चे ऑनलाईन पेमेंट करा ( UPI, डेबिट / क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग ).
-
पास तुमच्या फास्टॅग खात्याशी लिंक होईल आणि १५ ऑगस्ट रोजी SMS द्वारे ॲक्टिवेशनची माहिती मिळेल.
महत्त्वाचे नियम
-
फक्त खासगी वाहनांसाठी लागू.
-
व्यावसायिक वाहनांना लाभ नाही.
-
पास नॉन-ट्रान्सफरेबल – केवळ नोंदणीकृत वाहनासाठीच वैध.
-
निवडक राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरच वापरता येईल.
या उपक्रमामुळे प्रवासाचा वेळ, टोलवरील गर्दी आणि खर्च तिन्ही गोष्टींमध्ये बचत होणार असून, राष्ट्रीय महामार्गांवरील प्रवास अधिक सोयीस्कर होण्याची अपेक्षा आहे.
————————————————————————————–