कृष्णात चौगले : कोल्हापूर
यंदा पावसाने मान्सूनपूर्व मशागतीस साथ दिली नाही. परिणामी रोहिणी नक्षत्रातील पेरणी साधता आली नाही. मात्र, मृग नक्षत्राच्या तोंडावर काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांमध्ये पुन्हा आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे आता खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री केंद्रावर गर्दी करत आहेत.
खरिपातील बियाणे, खते खरेदी करताना शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
काही ठिकाणी बोगस बियाणे, अवैध औषधे विक्रीस येण्याच्या घटना घडतात. त्यामुळे अशा फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी जागरूक राहणे गरजेचे आहे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, आता सुरू होणाऱ्या पावसावर संपूर्ण खरिप हंगामाची फलनिष्पत्ती अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी पावसाच्या एकूण वाटचालीचा अंदाज घेऊन योग्य नियोजन करत आहेत.
शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी…
- बनावट भेसळयुक्त बियाणे, खते, किटकनाशके खरेदी टाळण्यासाठी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडून पावतीसह खरेदी करा
- खरेदी केलेल्या बियाण्यांचे वेष्टन/पिशवी, टॅग, खरेदीची पावती पिकाची कापणी होई पर्यंत जपून ठेवावे
- बियाण्यांची पाकिटे सीलबंद असल्याची खात्री करावी
- बियाणे उगवणीच्या खात्री साठी पाकिटावरील अंतिम मुदत पहावी
- कीटकनाशके अंतिम मुदतीच्या आतील असल्याची खात्री करावी
- सोयाबीन अथवा इतर बियाणे पेरणीसाठी घरच्या बियाण्यांची घरच्या घरी उगवण क्षमता तपासून खात्री करावी
- बॅग वरील छापील किमतीपेक्षा जास्त किमतीत रासायनिक खते खरेदी करू नये.
शेतीविषयक इतर सल्ला….
- जमिनीत ओल असल्याशिवाय पेरणी करून नयेत
- खरिपासठी योग्य वाणाची निवड करावी
- पेरणीपूर्व बीज प्रक्रिया करावी
- कुळवणी अगोदर शेणखत मिसळावे
आता मान्सूनने दिलेल्या उघडीपामुळे शेतकऱ्यांमध्ये नव्या उमेदीनं शेतीकामाला गती मिळाली आहे. योग्य वेळेवर पेरणी होऊन चांगला पाऊस लाभल्यास यंदाचा हंगाम समाधानकारक ठरेल, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत. योग्य बियाणे व निविष्ठांची निवड केल्यास शेतकरी या हंगामात उत्तम उत्पादन घेऊ शकतात.
———————————————————————————————————————–