कुरुंदवाड : अनिल जासुद
अकिवाट (ता.शिरोळ) येथील पारीसा दादा कल्लणावर यांनी आपल्या शिवारात याचवर्षी विविध प्रकारची भाजीपाला पिक घेतले. ऑगस्टमध्ये आलेल्या पुराने त्यांच्या श्रमावर पाणी फिरवले. पुराच्या पाण्यामुळे संपुर्ण भाजीपाला कुजून गेला. मात्र या संकटावर मात करीत आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी निसर्गाशी दोन हात करुन झालेल्या नुकसानीची तमा न बाळगता पुन्हा त्याच क्षेत्रात त्यांनी भाजीपाला लावला आहे.
कल्लणावर यांची अकिवाट- मजरेवाडी दरम्यानच्या रस्त्यालगत १० गुंठे शेती क्षेत्र आहे. यामध्ये त्यांनी जूनच्या अखेरीस मशागतवैगेरे करुन भाजीपाला पिक घेण्याचे ठरविले. यानुसार त्यांनी १० गुंठे क्षेत्रात एकाचवेळी एक नाही दोन नाही तर वेगवेगळ्या प्रकारची तब्बल ८ भाजीपाला पिकांची लागवड केली. यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या सरीवर भेंडी, शेपु, मेथी, कोथीबीर, श्रावण घेवडा, गवारी, वरणा आदी भाजीपालाची पेरणी केली. या भाजीपाल्यासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारची रासायनिक खताची मात्रा दिली नव्हती. संपुर्ण भाजीपाला फक्त पाऊसच्या पाण्यावर ऑगस्टच्या सुरुवातीला चांगलाच बहरला होता. याची पारीसा कल्लणावर यांनी आपल्या पत्नीसह तोडणी करुन सुरुवातीला अकिवाट, सैनिक टाकळी, टाकळीवाडी, कुरुंदवाड, राजापुर आदी गावातील आठवडी बाजारात स्वतः भाजीपाल्याची विक्री केली. कल्लणावर हे व्यवसायाने आचारीचे काम करीत असल्याने त्यांची या परिसरात चांगलीच ओळख आहे. यामुळे त्यांनी आणलेला भाजीपाला हातोहात विकला गेला. यातून त्यांना दहा हजार रुपयाचे उत्पन्न मिळाले होते. अजूनही काही दिवसात शेतशिवारात जवळपास १५ ते २० हजार रुपये होतील इतका भाजीपाला शिल्लक होता.
भाजीपाला तोडणी सुरु असतानाच ऑगस्टच्या मध्यावर जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु झाला. चार- पाच दिवसाच्या मुसळधार पावसाने व धरणातील विसर्गामुळे शिरोळ तालूक्याला पुराचा वेढा पडला. पाहता पाहता नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडून शेत शिवारात शिरले व तालुक्यातील हजारो हेक्टरमधील पिकांना आपल्या मगरमिठ्ठीत घेतले. याच मगरमिठ्ठीत कल्लणावर यांच्याही १० गुंठे क्षेत्रातील भाजीपाला सापडला. तब्बल आठ ते दहा दिवस हा भाजीपाला पुराच्या पाण्याखाली राहिला. यामुळे सर्वच भाजीपाला अतिपाण्यामुळे कुजून गेला.