कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
विधानसभा निवडणुकीपूर्वी संभाव्य जनतेच्या नाराजीचा धोका ओळखून महायुती सरकारने शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा तात्पुरता गुंडाळून ठेवला होता. मात्र, सत्तेवर आल्यानंतर सरकारने पुन्हा एकदा या महामार्गासाठी आक्रमक पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. याला शेतकऱ्यांकडून जोरदार विरोध होत असून, सध्या पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात या विरोधाला तीव्र स्वरूप प्राप्त होत आहे.
काल सांगलीमध्ये शेतकऱ्यांनी तगडा पोलिस बंदोबस्त झुगारून थेट शेतात झोपून महामार्गाच्या मोजणीला विरोध केला. आता या आंदोलनाची धग धाराशिवमध्येही पोहोचली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी या आंदोलनाला थेट पाठिंबा जाहीर केला आहे. ते आज धाराशिव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणार असून, स्वतः मोजणी थांबवण्यासाठी पुढाकार घेणार आहेत.
राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, “शक्तीपीठ महामार्गामुळे आपल्या जमिनी जाणार आहेत, रोजगार जाणार आहे आणि भविष्यातील पिढ्यांच्या पोटावर लाथ बसणार आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने या अन्यायकारक प्रकल्पाला विरोध करावा.”
दरम्यान, सरकारने अद्याप या आंदोलनावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, शेतकऱ्यांचा विरोध पाहता या प्रकल्पाची वाटचाल किती सहज होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मतांसाठी घोषणा? आता जनता विचारतेय !
सतेज पाटील – तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीपूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा केली होती. आता मात्र पुन्हा तोच प्रकल्प पुढे रेटला जातोय. त्यामुळे ही घोषणा केवळ मतांसाठी होती का? असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.गरज नसलेला हा महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारू नये, अशी मागणीही त्यांनी केली.
हा विषय केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे. “निवडणुकीपूर्वी कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग होणार नाही, अशी अधिसूचना काढण्यात आली होती. ती अधिसूचना रद्द करून पुन्हा नव्याने काढली गेली, ही माहिती समोर आली आहे,” असे त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडी म्हणून आम्ही ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. यासाठी आज १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक घेऊन पुढील आंदोलनाची रणनीती ठरवण्यात येणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले.
“हे सरकार पूर्णपणे कॉन्ट्रॅक्टर धार्जिणं आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन ठेकेदारांच्या फायद्यासाठी प्रकल्प रेटण्याचा डाव सुरू आहे.”
मंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
यासोबतच त्यांनी हसन मुश्रीफ आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या भूमिकेवरही साशंकता व्यक्त केली. “कॅबिनेटच्या बैठकीत त्यांनी विरोध केला का ? नाराजी दाखवली का ? याबाबत आम्हाला कोणतीही स्पष्टता नाही. त्यांच्या भूमिकेवरच मोठं प्रश्नचिन्ह आहे,” असे ते म्हणाले.
महायुती सरकारमध्येच मंत्री एकमेकांविरुद्ध बोलताना दिसत आहेत. त्यामुळे या सरकारची हातबलता चव्हाट्यावर आली आहे, असा घणाघातही सतेज पाटील यांनी केला.
धाराशिवमधील शक्तीपीठ महामार्गाची मोजणी प्रक्रिया थांबवली, शेतकरी आंदोलनाचा धसका
- धाराशिवमधील शक्तीपीठ महामार्गाची मोजणी प्रक्रिया थांबवली, शेतकरी आंदोलनाचा धसका
- राजू शेट्टी यांच्या बैठकीत धाराशिव प्रशासनाचा निर्णय
- शेतकऱ्यांच्या विरोधापुढे सरकार अखेर झुकले
- शेतकऱ्यांचा विरोध झुगारून प्रशासनाकडून करण्यात येत होती मोजणी
- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात केली प्रशासनासोबत चर्चा
- शक्तीपीठ महामार्गाच्या चर्चेला जिल्हाधिकारी गैरहजर, राजू शेट्टी व्यक्त केली नाराजी
राजू शेट्टींच्या प्रत्यक्ष आंदोलनात उतरल्यामुळे आणि सतेज पाटलांसारख्या नेत्यांच्या विरोधामुळे शक्तीपीठ महामार्गाला विरोध आणखी तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत. आता सरकार या आंदोलनावर कोणती भूमिका घेते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
————————————————————————————————-



