मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
विधानभवनात रमी खेळल्याच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले माणिकराव कोकाटे यांच्याकडून अखेर कृषी खातं काढून घेण्यात आलं असून, त्यांच्याकडे आता क्रीडा खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, दत्ता भरणेंकडे कृषी मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या घडामोडीनंतर आता मंत्रिमंडळात आणखी कोणतेही बदल होणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. “बेशिस्त वर्तन खपवून घेतलं जाणार नाही. आता थेट कारवाई केली जाईल,” असा सज्जड दम त्यांनी यावेळी दिला.
कोकाटेंना क्रीडा खातं देण्यात आल्यानंतर आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. “रमी खेळाला आंतरराष्ट्रीय मान्यता द्या,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
कृषी खातं काढून घेतल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतलेला निर्णय मला मान्य आहे. त्या निर्णयानुसारच मी माझी पुढील वाटचाल करणार आहे,” असं कोकाटे यांनी म्हटलं आहे. यामुळे रमी प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादावर सरकारनं खाते बदलाच्या मार्गाने निभाव घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.
———————————————————————————–