मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट सत्तेत सहभागी होण्याचं खुलं निमंत्रण दिलं आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित निरोप समारंभात फडणवीस यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, उद्धवजी, २०२९ पर्यंत आमच्या विरोधी बाकावर येण्याचा काही स्कोप नाही. तुम्हाला इकडे (सत्तेत) यायचं असेल, तर स्कोप आहे. आपण वेगळ्या पद्धतीने बोलूया. फडणवीसांच्या या वक्तव्यानं उपस्थितांमध्ये क्षणभर शांतता पसरली आणि लगेचच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. ठाकरे गटाला सत्तेची ओपन ऑफर देणं म्हणजे एक प्रकारे भाजपकडून राजकीय जवळीक वाढवण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.
राजकीय अर्थ
भाजपने सुरू केलेला स्ट्रॅटेजिक खेळ – फडणवीस यांचं वक्तव्य हे निव्वळ औपचारिक शुभेच्छा नव्हे, तर पुढील महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांपूर्वीच सुरू झालेली रणनीती मानली जात आहे.
शिवसेना ठाकरे गटाला सत्तेचा नवा पर्याय – उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा एक मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. अलीकडेच ठाकरे गटाने मोदी सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली असताना, फडणवीसांची ही ऑफर आश्चर्यकारक आहे.
महाआघाडीत दरार निर्माण होणार – ही ऑफर महाआघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासाठीही अस्वस्थ करणारी आहे. उद्धव ठाकरे जर भाजप सोबत जवळीक साधण्याच्या विचारात असतील, तर महाआघाडीत फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
फडणवीसांचे राजकारण : खेळी एक, संदेश अनेक
फडणवीस यांचं हे वक्तव्य जितकं विनोदी सुरात होतं, तितकंच ते राजकीय संकेतांनी भरलेलं होतं. २०२९ पर्यंत विरोधी बाकावर न येण्याचा आत्मविश्वास दाखवणं, आणि त्याचवेळी उद्धव ठाकरे यांना सत्तेचं आमंत्रण देणं, हे भाजपच्या मजबूत रणनीतीचं प्रतीक मानलं जातं.
सध्या तरी उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या गटाकडून या वक्तव्यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र महाआघाडीतील नेत्यांच्या चर्चांना आता नवा आयाम मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं सत्तेचं निमंत्रण हे महाराष्ट्राच्या आगामी राजकारणात एक नवे वळण ठरू शकतं. आता बघावं लागेल की उद्धव ठाकरे हा ‘स्कोप’ स्वीकारतात की नाही, आणि महाआघाडी यावर काय भूमिका घेते!
————————————————————————————————-



