कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
जिल्ह्यात डेंग्यूच्या संभाव्य प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी आणि डासोत्पत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्वसमावेशक जनजागृती अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असते, विशेषतः ग्रामीण भागातील अतिजोखमीच्या गावांमध्ये डासांच्या अनियंत्रित वाढीमुळे हा धोका अधिक गंभीर बनतो. यामुळे जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयाने हे अभियान हाती घ्यावे अशा सूचना आरोग्य विभागाला केल्या.
डेंग्यूच्या लक्षणांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करणे आणि डासोत्पत्ती रोखणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असेल.
जिल्ह्यात अतिजोखमीच्या दोन नगरपालिकांसह ४८ गावांमध्ये विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्पष्ट केले की, डेंग्यू हा केवळ आरोग्याचा प्रश्न नाही, तर सामाजिक जागरूकता आणि स्वच्छतेच्या अभावामुळे उद्भवणारी समस्या आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आपल्या परिसरात स्वच्छता राखणे आणि डासांची पैदास होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.
या अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्यात आणि विशेषतः अतिजोखमीच्या गावांमध्ये जागरूकता कार्यशाळांचे आयोजन करुन आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि स्थानिक स्वयंसेवकांचा सहभाग घेवून गावस्तरावर माहिती पोहोचवली जाईल. तसेच प्रत्येक घराघरात तपासणी व जनजागृती मोहिम राबविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. डेंग्यूची लक्षणे, कारणे आणि प्रतिबंध याबाबत पत्रके, बॅनर आणि सोशल मीडियावर प्रचार करण्याचे निर्देशही दिले.
डासोत्पत्ती रोखण्यासाठी घरगुती पाण्याच्या टाक्या, कूलर आणि इतर साठ्यांची नियमित तपासणी, डासांच्या प्रजननस्थळांवर कीटकनाशक फवारणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल. जिल्ह्यात २०२२ या वर्षात ८७७, २०२३ ला ५५६, २०२४ ला १२४३ आणि यावर्षी आत्तापर्यंत एकुण ६८ डेंग्यू रुग्ण आढळून आले आहेत.
या अभियानासाठी आरोग्य विभाग, पंचायत समिती, महापालिका आणि शिक्षण विभाग यांच्यात समन्वय साधला जाणार आहे. तसेच आरोग्य विभागानेही संशयित रुग्णांच्या तपासणी चाचण्यांची संख्या वाढविण्याचे निर्देशही या बैठकीत दिले. नागरिकांनी ताप, अंगदुखी, डोकेदुखी यांसारखी लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.
उपस्थिती- जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरूद्ध पिंपळे, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. फारुख देसाई, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद मोरे यांच्यासह आरोग्य विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
——————————————————————————————–