कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूरात काल सकाळी झालेल्या पावसानंतर दिवसभर पूर्ण उघडीप होती. आज तर सकाळपासून कडक उन पडले आहे. हे लक्षण अचानक जोराचा पाऊस येण्याचे असते. हवामान विभागानेही असाच अंदाज वर्तविला आहे. पुढील २४ तासांमध्ये सांगली, लातूर, धाराशिव, नांदेड या भागांमध्ये जोरदार पावसाची हजेरी असेल तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, कोल्हापूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर इथं विजांच्या कडकडटासह पावसाची हजेरी असेल.
पावसाच्या विश्रांतीमुळं आणि दिवसभरात कधी कधी पडणाऱ्या कडक उन्हामुळे राज्याच्या बहुतांश भागांमध्ये तापमानात पुन्हा एकदा लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या ४८ तासांमध्ये मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्ये तीव्र उकाडा जाणवत होता. मात्र आजपासून हवामानात काही बदल होण्याची शक्यता आहे. आज दिवसभर आकाश अंशत: ढगाळ राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
राज्याचे सरासरी तापमान ३२ अंशांपेक्षा जास्त झाल्याने उकाडा वाढला आहे. तर कोकणातील दक्षिण भाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या पूर्वेकडील जिल्ह्यांत मात्र जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानाच्या याच स्थितीमुळं या भागांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सातारा,सांगली, धाराशिव, लातूर आणि नांदेडमध्येसुद्धा जोरदार पावसाची हजेरी असेल. पुणे आणि कोल्हापुरातील घाट क्षेत्रांवर पावसाळी ढग गर्दी करून तुरळक सरींची हजेरी पाहायला मिळेल क्वचितच जोराचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.