कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूरपासून अवघ्या ३५ किलोमीटरवर असलेले आणि जैविक विविधतेने नटलेले मसाई पठार आता ‘संवर्धन राखीव क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले असून, येथे प्रवेशासाठी पर्यटकांकडून शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य वन्यजीव मंडळाने घेतला आहे. या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली असून, विनापरवाना प्रवेश करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा वन विभागाने दिला आहे.
का घेतला हा निर्णय ?
मसाई पठारावर दुर्मिळ वनस्पती व वन्यजीवांचे अधिवास असून, पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी आणि वन्यजीवांच्या भ्रमणमार्गांचे संरक्षण करण्यासाठी राज्य वन्यजीव मंडळाने ५.३४ चौरस किलोमीटर क्षेत्र ‘संवर्धन राखीव क्षेत्र’ म्हणून जाहीर केले आहे. येथील निसर्ग सौंदर्य आणि जैवविविधता जपण्यासाठी पर्यटकांकडून नाममात्र प्रवेश शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पन्हाळ्यापासून अवघ्या आठ किलोमीटरवर असलेले मसाई पठार हिरव्यागार गवताची शाल पांघरल्यासारखे मनोहारी दृश्य सादर करते. पाचगणीच्या टेबल लँडपेक्षाही विस्तीर्ण असलेले हे पठार सुमारे चार ते पाच किलोमीटर लांब असून, निसर्गप्रेमींसाठी एक आदर्श पर्यटन स्थळ ठरत आहे.
प्रवेश शुल्क
पर्यटकांकडून आकारले जाणारे शुल्क पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे
-
दुचाकी वाहन : ₹ २०
-
चारचाकी वाहन : ₹ ५०
-
कॅमेरा वापरण्यासाठी : ₹ २००