कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देणाऱ्या आणि ‘शिकणे म्हणजे केवळ पाठांतर नव्हे’ हा दृष्टिकोन बाळगणाऱ्या सोमनाथ वाळके सरांच्या रचनावादी शिक्षण मॉडेलला शैक्षणिक वर्तुळात मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांनी विकसित केलेल्या या मॉडेलमुळे विद्यार्थी केवळ माहिती आत्मसात करत नाहीत, तर ती स्वतःच्या अनुभवातून शिकतात, विचार करतात आणि नव्या कल्पना मांडतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला अधिक चालना मिळते. विद्यार्थीपूर्ण एकाग्रतेने ज्ञानार्जन करतात. आज शिक्षक दिन. यानिमित्त उपक्रमशील शिक्षक सोमनाथ वाळके यांच्याविषयी जाणून घेऊया!
वाळके सर हे शिक्षकी पेशात गेली अनेक वर्षे कार्यरत असून त्यांनी ग्रामीण भागातील शाळांमध्ये रचनावादी पद्धतीने शिक्षण दिले आहे. त्यांच्या या अभिनव पद्धतीमुळे शाळेतील विद्यार्थी विविध उपक्रमांत भाग घेत शिक्षणाशी जोडले गेले आहेत. त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. यामध्ये ‘राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार’, ‘इनोव्हेटिव्ह एज्युकेटर सन्मान’, एनसीईआरटी तर्फे दिला जाणारा ‘शैक्षणिक नवोन्मेष पुरस्कार’ यांचा समावेश आहे.
शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग करत राहणारे वाळके सर म्हणतात, “विद्यार्थी शिकण्यासाठी तयार असतात, गरज असते ती योग्य संधी, मार्गदर्शन आणि प्रेरणादायी वातावरणाची.” त्यांच्या या दृष्टीकोनामुळे ते अनेक शिक्षकांचे आदर्श ठरले आहेत.
सध्या वाळकेसर त्यांच्या मॉडेलचा प्रसार महाराष्ट्रातील इतर शाळांमध्ये करण्यासाठी कार्यरत आहेत. शिक्षकांना प्रशिक्षण देणे, कार्यशाळा घेणे आणि डिजिटल साधनांच्या वापरावर भर देणे यासाठी ते झटत आहेत. सध्या वाळकेसर बीड जिल्ह्यातील आष्टा हरिनारायण गावातील ‘पीएमश्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत’ शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.