नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२०२७ च्या चौथ्या पर्वात आता थरार अधिकच वाढला आहे. नऊ संघांत अंतिम फेरी गाठण्यासाठी चुरशीची स्पर्धा सुरू असताना, प्रत्येक गुण महत्त्वाचा ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर इंग्लंडला स्लो ओव्हर रेटचा मोठा फटका बसला आहे.
भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटीत विजय मिळवत इंग्लंडने महत्त्वाचे १२ गुण पटकावले होते आणि विजयी टक्केवारी ६६.६७ टक्क्यांवर पोहोचली होती. त्यामुळे इंग्लंडने श्रीलंकेसोबत संयुक्तपणे दुसरे स्थान मिळवले होते. मात्र हे यश फार काळ टिकू शकले नाही.
स्लो ओव्हर रेटमुळे गुण कपात, दंडही ठोठावला
आयसीसीच्या नियमानुसार, संथ गतीने षटकं टाकल्यास प्रत्येक अपूर्ण षटकासाठी संघाला एक डब्ल्यूटीसी गुण गमवावा लागतो आणि खेळाडूंना सामन्याच्या शुल्कातील पाच टक्के रक्कम दंड स्वरूपात द्यावी लागते. इंग्लंडने निर्धारित वेळेत आवश्यक षटकं पूर्ण न केल्यामुळे त्यांचे दोन गुण वजा करण्यात आले आहेत. यासोबतच संपूर्ण संघाच्या सामना फी मधून दहा टक्के दंड आकारण्यात आला आहे.
बेन स्टोक्सने मान्य केली चूक
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने स्लो ओव्हर रेटची जबाबदारी स्वीकारली आहे आणि चूक मान्य करत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे. संघाचे आगामी सामने लक्षात घेता ही सुधारणा अत्यावश्यक ठरणार आहे.
गुणवजा झाल्यानंतर इंग्लंडचे डब्ल्यूटीसी गुण २४ वरून २२ वर आले असून त्यांच्या विजयी टक्केवारीत घट होऊन ती ६१.११ टक्के झाली आहे. यामुळे इंग्लंड थेट दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.
ही घटना इंग्लंडसह इतर संघांसाठीही एक धडा आहे की, केवळ विजय मिळवणे पुरेसे नाही, तर मैदानातील शिस्तीचे पालनही तितकेच महत्त्वाचे आहे. आगामी सामन्यांमध्ये संघांनी या बाबतीत अधिक जागरूक राहणे गरजेचे ठरणार आहे.
——————————————————————————————–



