नाम सारखे विविध प्रयोग वेगवेगळ्या माध्यमांतून होणं महत्त्वाचं असून या प्रयोगांना सरकारी साखळीत सामावून घेणं गरजेचं आहे. याचबरोबर महिला वर्गासाठी ५ ते ६ तासांचे ‘वर्क मॉड्युल’ तयार करत अधिकाधिक महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखविली. नाम फाऊंडेशन’ ही नामांकित संस्था गेली १० वर्षे पर्यावरण आणि विविध शाश्वत विकास क्षेत्रांमध्ये अविरत कार्यरत आहे. संस्थेचा दशकपूर्ती समारंभ नुकताच पुण्यात झाला. या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
पालखी नृत्याने तसंच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करीत या सोहळ्याची सुरुवात झाली. या स्नेहमेळाव्यात केंद्रीय रस्ते परिवन आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, संगणक शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, उद्योग/मराठी भाषा मंत्री उदय सामंत आदी उपस्थित होते.
‘नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित असून त्यांच्या या कार्यातून प्रत्येकाने प्रेरणा घेत सामाजिक कामासाठी पुढाकार घेतला तर ही सामाजिक चळवळ नक्कीच समाजात, देशात बदल घडवू शकते’, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. समस्यांचं रूपांतर संधीत करणाऱ्यांच्या यादीत आपलं नाव असायला हवं, असं ते म्हणाले. त्याचप्रमाणे चांगल्या सामाजिक कार्यासाठी राजकीय प्रचाराची गरज नसते, त्यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची असं सांगताना त्यांनी ‘नाम’ने केलेल्या कार्याचे आणि त्यांच्या निष्ठेचे कौतुक केलं.
नाम या संस्थेचं कामच त्यांच्या यशाची पावती आहे. अशा संस्थांचा नावलौकिक सर्वत्र व्हावा यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे. शासनसोबतही अनेक कार्यक्रमांतून/ योजनांतून आम्ही ‘नाम’ संस्थेला समाविष्ट केले असून याअंतर्गत अनेक चांगली कामं आजवर झाली आहेत. ज्याचा मी स्वतः साक्षीदार असल्याचे उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं.
सप्टेंबर २०१५ मध्ये ‘नाम फाऊंडेशनची’ स्थापना झाली आणि आज फाऊंडेशनची दशकपूर्ती होत आहे. या वाटचालीत आजवर असंख्य हातांनी माणूसकीच्या या यज्ञात मोठं योगदान दिलं. मानवतेचा हा यज्ञ यापुढेही असाच अखंडपणे चालत राहील, यासाठी ‘नाम फाऊंडेशन’ कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन ‘नाम’चे संस्थापक-अध्यक्ष नाना पाटेकर आणि संस्थापक-सचिव मकरंद अनासपुरे यांनी यावेळी केलं.