कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सध्या एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक वृद्ध वारकरी बाबा आणि एक तरुण फोटोग्राफर यांच्यातला संवाद प्रत्येकाला अंतर्मुख करणारा ठरतो आहे.
व्हिडिओची सुरुवात होते इंद्रायणी नदीच्या काठावर बसलेल्या एका वृद्ध वारकऱ्यापासून. त्या बाबांनी फोटो ग्राफर सागरकडे नम्र विनंती केली – “माझा फोटो काढ”. यावर सागरने हसत उत्तर दिलं – “हो, त्याचसाठी आलोय”, आणि फोटो काढायला सुरुवात केली.
यानंतर सागरने सहज विचारलं, “तुम्ही कुठले?”
त्यावर वृद्ध भाविकांनी अत्यंत भावपूर्ण उत्तर दिलं “वैकुंठ…”
क्षणभर निस्तब्धता… आणि मग त्यांनी म्हटलं
“कष्ट करा… तुमचं काम झालं. आता आपली परत भेट नाही.”
या क्षणाने संपूर्ण व्हिडिओचा सूरच बदलून टाकला. साक्षात भक्ती आणि जीवनाचं तत्त्वज्ञान यांचा संगम त्या एका वाक्यातून उमटला. या शब्दांनी केवळ सागर गुप्ताच नाही, तर लाखो नेटकऱ्यांचं मन हेलावून टाकलं.
“आज विठ्ठल भेटला,”, “तो बाबा म्हणजे साक्षात पांडुरंगच होता,” अशा अनेक प्रतिक्रिया व्हिडिओखाली उमटल्या आहेत.
वारकरी संप्रदाय आणि आषाढी वारी ही केवळ परंपरा नाही, ती जगण्याची एक शैली आहे, हे या क्षणांमधून पुन्हा अधोरेखित झालं आहे. वृद्ध वारकऱ्याचं हे एक वाक्य “आपली परत भेट नाही” एकीकडे आयुष्याचं अंतिम सत्य सांगतं, तर दुसरीकडे त्या भेटीतून निर्माण झालेला भक्तीरस मनामनांत कायमचा ठसा उमटवतो.
वारीची वाट ही अशाच श्रद्धा, प्रेम आणि जीवनदृष्टीच्या क्षणांनी भारलेली आहे… आणि म्हणूनच ही वारी ‘पंढरपूरची’ नसून ‘आपल्या मनाची’ होते.