प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असा क्षण नक्कीच येतो.
ऑफिसमध्ये एखाद्या टीम मेंबरसोबत, बॉससोबत किंवा घरी अगदी छोट्याशा कारणावरून वाद सुरू होतो. काही क्षणांतच आपला स्वतःवरचा ताबा सुटतो. आपण काहीतरी बोलून जातो, काहीतरी करून बसतो आणि नंतर उरतो तो फक्त पश्चाताप. त्या एका क्षणासाठी आपली सगळी समज, आपलं ज्ञान, आपली वर्षानुवर्षांची साधना जणू नाहीशी होते.असं वाटतं की कोणीतरी आपल्या आतला पायलट बाहेर फेकून दिला आहे आणि आपलं आयुष्य हायजॅक केलं आहे. शांत झाल्यावर प्रश्न पडतो “मी असा कसा वागलो ?”
विज्ञान काय सांगतं?
भावनिक उद्रेकाच्या क्षणी आपली जागरूकता खरंच नाहीशी होते का?
न्यूरोसायन्स सांगतं नाही.जेव्हा आपल्याला धोका जाणवतो (तो धोका प्रत्यक्ष असो किंवा भावनिक), तेव्हा मेंदूतील अमिग्डाला हा भाग सक्रिय होतो. हा मेंदूचा “धोक्याचा अलार्म” आहे.
हा अलार्म वाजताच मेंदूचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स — म्हणजे विचार, निर्णय, विवेक यांचा केंद्रबिंदू — तात्पुरता ऑफलाईन होतो.

यालाच म्हणतात Fight or Flight Response.
शरीर लढण्यासाठी किंवा पळून जाण्यासाठी तयार होतं. त्या वेळी शहाणपणाचे विचार करण्यासाठी ऊर्जा उरतच नाही.म्हणून रागाच्या भरात विवेक हरवणं ही नैतिक चूक नाही, ती हजारो वर्षांच्या उत्क्रांतीतून आलेली स्वसंरक्षणाची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे.
पण इतक्या छोट्या गोष्टीवर एवढी मोठी प्रतिक्रिया का?
कारण ट्रिगर बहुतेक वेळा वर्तमानातला नसतो.
तो आपल्या भूतकाळातील न सुटलेल्या भावनिक आठवणींना जागं करतो.
लहानपणी सतत “तू काही कामाचा नाहीस” असं ऐकलेली व्यक्ती, आज ऑफिसमध्ये बॉसने साधं “हे काम नीट झालं नाही” म्हटलं तरी शरीरासाठी तो फीडबॅक नसतो —
तो भूतकाळातला अपमान असतो, जो पुन्हा जिवंत होतो.
आपल्या मज्जासंस्थेसाठी आठवण आणि वास्तव यात फरक नसतो.
ती त्या क्षणाला आत्ता घडतोय असं समजून तशीच प्रतिक्रिया देते.
शास्त्र काय सांगतात?
आपली चेतना किंवा जागरूकता नाहीशी होत नाही ती फक्त झाकली जाते.
जसं आकाशात सूर्य नेहमी असतो, पण ढग आल्यावर तो दिसत नाही,
तसं भावनिक उद्रेकाच्या वेळी आपल्या संस्कारांचे ढग चेतनेला झाकून टाकतात.
भगवद्गीतेत (अध्याय २, श्लोक ६२–६३) ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय अचूक सांगितली आहे
- क्रोधाद्भवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः।
- अर्थ: क्रोधापासून मोह (delusion) निर्माण होतो आणि मोहामुळे स्मृतिभ्रंश (loss of memory/confusion) होतो..
- स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति॥
- अर्थ: स्मृतिभ्रंशाने बुद्धीचा (intellect) नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्याने तो मनुष्य स्वतःचा विनाश करून घेतो..
हे श्लोक सांगतात की, भौतिक गोष्टींचा सतत विचार केल्याने आपण त्यांच्यात अडकतो. यातून इच्छा, क्रोध, गोंधळ आणि शेवटी बुद्धीचा नाश होऊन पतन होते.. म्हणूनच, भगवान श्रीकृष्ण या श्लोकांमधून इंद्रियांवर आणि मनावर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्व सांगता
- अर्थ: स्मृतिभ्रंशाने बुद्धीचा (intellect) नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्याने तो मनुष्य स्वतःचा विनाश करून घेतो..
इथला स्मृती विभ्रम म्हणजे दैनंदिन जीवनातील प्रसंग चावी कुठे ठेवली हे विसरणं नव्हे, तर “मी कोण आहे” याचाच विस्मरण आत्मविस्मरण.
कठोपनिषदातील रथाचं रूपक
शरीर म्हणजे रथ,
इंद्रिये म्हणजे घोडे,
मन म्हणजे लगाम,
बुद्धी म्हणजे सारथी
आणि आत्मा म्हणजे रथाचा मालक.
भावनिक उद्रेकाच्या वेळी घोडे उधळतात, लगाम सुटतो,
सारथी कमजोर पडतो
आणि रथ कुठेही धावतो.
आत्मा रथातच असतो, पण विसरला जातो.
भावनांशी लढणं हा उपाय नाही. भावनांना दाबून टाकणं म्हणजे संस्कार अधिक खोलवर रोवणं.
खरा उपाय म्हणजे साक्षीभाव.
“मी रागावलो आहे” याऐवजी “इथे राग आहे” असं पाहणं.
भावनेचा मालक न होता भावनेचा साक्षीदार होणं.
हे एका दिवसात होत नाही. तो एक सराव आहे, साधना आहे.
दररोज काही क्षण श्वासावर लक्ष केंद्रित करणं,विचारांना न जज करता पाहणं ही बुद्धीरूपी सारथ्याची ट्रेनिंग आहे.
हळूहळू Stimulus आणि Response यामध्ये एक छोटासा (एक सेकंद पेक्ष्या ही कमी असू शकतो)अवकाश तयार होतो.तोच अवकाश म्हणजे स्वातंत्र्य.
भावनिक उद्रेकात आपली जागरूकता नष्ट होत नाही,ती फक्त झाकली जाते.
विज्ञान याला Amygdala Hijack म्हणतं,शास्त्र याला आत्मविस्मरण म्हणतात.
उपाय भावनेशी युद्ध नाही,तर भावनेच्या ढगांपलीकडे असलेल्या जागरूकतेच्या सूर्याचं स्मरण आहे.
आणि महत्वाचे म्हणजे जागरूकता निर्माण करायची नसते,ती आपल्यात आहेच फक्त आठवायची असते.



