वॉशिंग्टन : वृत्तसेवा
जगभरातील प्रसिद्ध उद्योजक आणि ‘टेस्ला’ तसेच ‘एक्स’चे मालक इलॉन मस्क यांनी अमेरिकेत नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ‘अमेरिका पार्टी’ असे या नव्या पक्षाचे नाव असून, सध्याच्या रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षांच्या द्वि-पक्षीय राजकारणाला हा पक्ष जोरदार आव्हान देणार असल्याचं मस्क यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, या पक्षाचं नेतृत्व कोण करणार, पक्षाची रचना कशी असेल, याबाबत मस्क यांनी अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही.
ट्रम्पसोबतच्या वादातून उद्भवलेला निर्णय
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या वादानंतर मस्क यांनी प्रथमच नव्या पक्षाची शक्यता व्यक्त केली होती. ट्रम्प यांच्या सरकारचा भाग असतानाच मस्क आणि ट्रम्प यांच्यात काही मुद्द्यांवर मतभेद झाले. परिणामी दोघांनीही एकमेकांवर उघडपणे टीका केली. त्यानंतर मस्क यांनी सरकारपासून फारकत घेतली आणि नव्या पक्षाचा विचार पुढे आणला.
लोकमताचा आधार
या नव्या पक्षाची घोषणा करण्याआधी मस्क यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक जनमत चाचणी (पोल) घेतली होती. त्यामध्ये ‘अमेरिकेत नवीन राजकीय पक्ष असायला हवा का?’ असा थेट प्रश्न विचारण्यात आला होता. बहुसंख्य लोकांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला. याच पोलचा संदर्भ देत मस्क म्हणाले, “तुम्हाला नवा पक्ष हवा आहे आणि तो तुम्हाला मिळणार आहे.”
‘अमेरिका पार्टी’ची दिशा आणि प्राथमिक लक्ष
मस्क यांनी स्पष्ट केलं की, ‘अमेरिका पार्टी’ सध्या केवळ अमेरिकन संसदेमधील काही निवडक जागांवर लक्ष केंद्रीत करणार आहे. यामध्ये सिनेटच्या २ ते ३ जागा आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजच्या ८ ते १० जिल्ह्यांचा समावेश आहे.
अमेरिकेत दर दोन वर्षांनी हाऊसच्या ४३५ जागांसाठी निवडणुका घेतल्या जातात. त्याचप्रमाणे, सिनेटमधील १०० पैकी जवळपास एक तृतीयांश जागांवर निवडणुका होतात. या निवडणुकांमध्ये नव्या पक्षाची हळूहळू पाळंमुळं वाढवण्याचा मस्क यांचा हेतू आहे.
मस्क यांचा आरोप आणि उद्दिष्ट
‘आपल्या देशात सध्या जी ‘पार्टी सिस्टिम’ आहे, ती अनावश्यक खर्च आणि भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. इथं लोकशाही नाही, म्हणूनच नागरिकांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ‘अमेरिका पार्टी’ स्थापन केली जात आहे,’ असं मस्क यांनी ठामपणे सांगितलं.
ट्रम्प यांना पाठिंब्यानंतर आता विरोधाची भूमिका
काही महिन्यांपूर्वीच झालेल्या २०२४ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना थेट पाठिंबा दिला होता. एवढंच नव्हे, तर त्यांनी ट्रम्प यांच्या प्रचारासाठी तब्बल २५ कोटी डॉलर्सचा आर्थिक पाठिंबा दिला होता.
निवडणुकीनंतर ट्रम्प सरकारने मस्क यांची ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिएन्सी’ (DoGE) च्या प्रमुखपदी नियुक्ती केली होती. या विभागाचं काम सरकारी खर्चात कपात करणे आणि कार्यक्षमतेसाठी सूचना देणे हे होतं. मात्र, काही धोरणात्मक मुद्द्यांवर मतभेद झाल्यामुळे मस्क आणि ट्रम्प यांच्यात वाद वाढत गेला.
‘अमेरिका पार्टी’ च्या पक्ष रचनेचा आणि निवडणुकीतील सहभागाचा अधिकृत तपशील लवकरच स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे. इलॉन मस्क यांच्या या निर्णयामुळे अमेरिकन राजकारणात नवे वळण येण्याची शक्यता आहे. द्वि-पक्षीय राजकारणातून कंटाळलेल्या मतदारांसाठी हा पर्याय कितपत प्रभावी ठरतो, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.
—————————————————————————————-