वर्धा : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यात भाजपसाठी अनुकूल वातावरण असून, जनता पुन्हा भाजपला निवडून देण्यासाठी तयार आहे. मात्र, हे यश साध्य करायचं असेल, तर कार्यकर्त्यांनी अंतर्गत वाद विसरून एकसंघपणे काम केलं पाहिजे, असं स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
सोमवारी वर्धा येथे पार पडलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या महामंथन मेळाव्यात फडणवीस बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी स्पष्ट केलं की, या निवडणुका महायुतीत लढायच्या आहेत. मात्र, जिथे समन्वय शक्य नाही, तिथेही मैत्रीपूर्ण लढत ठेवायची आहे. कुठल्याही मित्रपक्षावर टीका टाळायची आहे.
फडणवीस म्हणाले, ” भाजप हा एक कुटुंब आहे. कधी दोन भावांमध्ये थोडीफार भांडणं होतातच, पण ती घरातल्या भांडणांसारखी असतात. निवडणुकीच्या तोंडावर मात्र हे सर्व विसरून एकत्र बसलं पाहिजे. वाद मिटवले पाहिजेत. अनेक पक्षांचे पतन यामुळेच झाले की, एकाने दुसऱ्याला ओढलं आणि पार्टीला खड्ड्यात घातलं. आपल्या पक्षात तसं होऊ देणार नाही.”
या अनुकूलतेचा उपयोग करत भाजपने सर्व जिल्ह्यांत संघटन मजबूत केलं पाहिजे, असं सांगताना त्यांनी नुकत्याच झालेल्या रक्तदान शिबिराचं उदाहरण दिलं. “पूर्वी शिवसेनेने एका दिवसात २५ हजार बाटल्या रक्त संकलित केल्या होत्या, तर आपल्याकडे २२ जुलै रोजी अध्यक्षांच्या आदेशानंतर ७८ हजार बाटल्या एका दिवसात संकलित झाल्या. कार्यकर्त्यांनी ठरवलं, तर काहीही अशक्य नाही, हे यावरून सिद्ध होतं,” असं फडणवीस म्हणाले.
भाजपच्या संघटनशक्तीचा, कार्यकर्त्यांच्या जोमाचा आणि जनतेच्या विश्वासाचा एकत्रित प्रभाव येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत दाखवायचा आहे, असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला “वाद विसरून कामाला लागा, अनुकूलता आहे, संधी साधा!”
—————————————————————————————-