कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याचे संकेत दिले असून, संपूर्ण प्रक्रिया डिसेंबर-२०२५ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे दिवाळीनंतर राज्यात आचारसंहिता लागू होऊन निवडणुकांचा धुरळा उडणार, असे संकेत मिळत आहेत.
निवडणुकांचे तीन टप्पे कसे असणार ?
सूत्रांनुसार, निवडणुका पुढीलप्रमाणे तीन टप्प्यांत होणार आहेत
-
पहिला टप्पा – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका
-
दुसरा टप्पा – नगरपालिका व नगरपरिषद निवडणुका
-
तिसरा टप्पा – मुंबईसह सर्व २९ महापालिकांची निवडणूक
सुप्रिम कोर्टाचा आदेश
६ मे २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला पुढील चार महिन्यांत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, पावसाळा आणि सणासुदीमुळे निवडणुकीचे वेळापत्रक थोडे पुढे ढकलण्यात आले असून दिवाळीनंतर निवडणुका घेण्यात येतील, असे राज्य निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात सादर करणार आहे.
राज्य शासनाचे नियोजन
राज्य शासनाने सर्व प्रभाग रचना पूर्ण करण्यासाठी स्पष्ट वेळापत्रक निश्चित केले आहे.
-
१ सप्टेंबर २०२५ : १९ महापालिका आणि २५० पेक्षा जास्त नगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याचा आदेश
-
४ सप्टेंबर २०२५ : मुंबई, ठाणे, पुणे महापालिकांसाठी प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना
या वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान अंतिम अधिसूचना जारी केली जाणार आहे.
२०११ ची जनगणना आधार
सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी २०११ ची जनगणना ग्राह्य धरली जाणार आहे. त्यातील अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्येच्या आधारावरच आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.
प्रभाग व वॉर्ड गटांच्या रचना, गटबांधणी आणि निवडणूक तयारीची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. अद्याप मतदार याद्या आणि मनुष्यबळवाटपासंबंधी काही परवानग्या शिल्लक आहेत, मात्र त्या लवकरच पूर्ण होतील, अशी माहिती आहे.
दिवाळी संपताच महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगणार असून, राज्यातील सत्तासंस्थांच्या पातळीवर मोठे राजकीय परिवर्तन घडण्याची शक्यता आहे. प्रभाग रचना, आरक्षण, आणि निवडणूक यंत्रणा सध्या युद्धपातळीवर कामाला लागली आहे. राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक ही ताकदीची परीक्षा ठरणार आहे.
—————————————————————————–



