प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
ओबीसी आरक्षणामुळे राजकीय गणिते बदलणार?
कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) हे आरक्षण निश्चित झाल्याने कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता नव्या महापौराकडे लागून राहिले आहे. नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीनंतर सत्तास्थापनेबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नसून, राजकीय हालचालींना वेग आला आहे.
महायुती काठावर, काँग्रेससमोर आव्हान
निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीची सत्ता अगदी काठावर आली आहे. दुसरीकडे काँग्रेसकडे सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने तिला अन्य पक्षांच्या पाठिंब्याची गरज आहे. मात्र सध्या काँग्रेससोबत कोणता पक्ष येणार, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
याच पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे.
“बॅक डोअरच्या चर्चा फ्रंट डोअरवर कशाला?” असे सूचक विधान करत त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात नवा ट्विस्ट दिला आहे. त्यामुळे आता महापौर कोणत्या पक्षाचा होणार? हा प्रश्न अधिकच महत्त्वाचा ठरला आहे.
ओबीसी आरक्षण – पुरुष महापौराची शक्यता
महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असले तरी ते स्त्री अथवा पुरुष दोन्हींसाठी खुले आहे. मागील महानगरपालिकेत सलग दोन वेळा महिला नगरसेवकांना महापौरपदाची संधी मिळाली होती. त्यामुळे यावेळी पुरुष उमेदवाराला संधी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
कोल्हापूरमधील ओबीसी प्रवर्गातील विजयी नगरसेवक
महापौरपदाच्या शर्यतीत खालील ओबीसी प्रवर्गातील विजयी नगरसेवकांची नावे चर्चेत आहेत
माधवी प्रकाश गवळी,विशाल किरण शिराळे,अनुराधा सचिन खेडकर,विजय सिंह वसंतराव देसाई,अजय इंगवले
अश्किन गणी आजरेकर,रेखा रामचंद्र उगवे,कौसर बागवान,मानसी लोळगे,प्रमोद देसाई,विजय सिंह खाडे,वैभव कुंभार
महापौर निवड थोडी लांबणीवर?
सध्या जिल्ह्यातील प्रमुख नेते जिल्हा परिषद निवडणुकीत व्यस्त असल्याने महापौर निवडीची प्रक्रिया थोडी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना नव्या महापौरासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.
इचलकरंजी : पहिला महापौर कोण?
दरम्यान, इचलकरंजी महानगरपालिकेच्या महापौरपदासाठीही ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे इचलकरंजीच्या पहिल्या महापौरपदासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.
भारतीय जनता पक्षाकडून खालील नावे चर्चेत आहेत
तानाजी पवार,विठ्ठल चोपडे,राजू पुजारी,उदय भातुंडे,योगेश पाटील,प्रदीप धोत्रे,सतीश मुळीक,सुशांत कलागते
इचलकरंजीचा पहिला महापौर कोण होणार, याकडेही संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
राजकीय वातावरण तापले
कोल्हापूर आणि इचलकरंजी या दोन्ही महत्त्वाच्या महानगरपालिकांतील महापौरपदाच्या निवडीमुळे स्थानिक राजकारण तापले असून, आगामी काळात सत्तासमीकरणे कोणत्या दिशेने वळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी जाहीर आरक्षण (सोडत)
| अ.क्र. | महानगरपालिका | महापौरपदासाठी आरक्षण |
|---|---|---|
| 1 | मुंबई | खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव) |
| 2 | पुणे | खुला प्रवर्ग |
| 3 | कोल्हापूर | ओबीसी (इतर मागास प्रवर्ग) |
| 4 | सोलापूर | खुला प्रवर्ग |
| 5 | छत्रपती संभाजीनगर | खुला प्रवर्ग |
| 6 | कल्याण-डोंबिवली | एसटी (अनुसूचित जमाती) |
| 7 | ठाणे | एससी (अनुसूचित जाती) |
| 8 | सांगली-मिरज-कूपवाड | खुला प्रवर्ग |
| 9 | पिंपरी-चिंचवड | खुला प्रवर्ग |
| 10 | जालना | एससी (अनुसूचित जाती – महिलांसाठी राखीव) |
| 11 | लातूर | एससी (अनुसूचित जाती – महिलांसाठी राखीव) |
| 12 | पनवेल | ओबीसी (इतर मागास प्रवर्ग) |
| 13 | इचलकरंजी | ओबीसी (इतर मागास प्रवर्ग) |
| 14 | अकोला | ओबीसी (इतर मागास प्रवर्ग – महिलांसाठी राखीव) |
| 15 | अहिल्यानगर | ओबीसी (इतर मागास प्रवर्ग – महिलांसाठी राखीव) |
| 16 | उल्हासनगर | ओबीसी (इतर मागास प्रवर्ग) |
| 17 | चंद्रपूर | ओबीसी (इतर मागास प्रवर्ग – महिलांसाठी राखीव) |
| 18 | जळगाव | ओबीसी (इतर मागास प्रवर्ग – महिलांसाठी राखीव) |
| 19 | अमरावती | खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव) |
| 20 | धुळे | खुला प्रवर्ग |
| 21 | नवी मुंबई | खुला प्रवर्ग |
| 22 | नांदेड | खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव) |
| 23 | नागपूर | खुला प्रवर्ग |
| 24 | नाशिक | खुला प्रवर्ग |
| 25 | परभणी | खुला प्रवर्ग |
| 26 | मालेगाव | खुला प्रवर्ग |
| 27 | मीरा-भाईंदर | खुला प्रवर्ग |
| 28 | वसई-विरार | खुला प्रवर्ग |






