नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतदानाच्या आकड्यांमध्ये फेरफार केल्याचा गंभीर आरोप वारंवार केला आहे. महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा आणि कर्नाटक लोकसभा निवडणुकीत भाजपाला जिंकवण्यासाठी मतांची चोरी झाली, असा सनसनाटी दावा त्यांनी केला होता.
या आरोपांमुळे आणि बिहारमधील मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाला विरोधी पक्षांकडून होत असलेल्या तीव्र विरोधामुळे निवडणूक आयोग सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने रविवारी दुपारी ३ वाजता नवी दिल्ली येथील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे.
विशेष म्हणजे, आयोग साधारणतः केवळ निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या घोषणेवरच पत्रकार परिषद घेतो. मात्र आजची परिषद ही आरोपांनंतरची पहिली प्रतिक्रिया असल्याने या परिषदेकडे देशाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी ज्या लोकांची नावं मतदार यादीमध्ये चुकीच्या पद्धतीने जोडली किंवा हटवली गेली आहेत, त्यांची यादी सादर करण्याची सूचना निवडणूक आयोगाने केली होती. त्यासोबतच एक शपथपत्रही दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र राहुल गांधी यांनी स्वतःच्या स्वाक्षरीसह शपथपत्र सादर केलेलं नसल्यामुळे त्यांनी माफी मागावी, अशी मागणीही आयोगाने केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आजच्या पत्रकार परिषदेत आयोग या आरोपांवर आणि मतदार यादीतील वादांवर अधिकृत भूमिका स्पष्ट करू शकतो. त्यामुळे बिहारसह देशातील राजकीय वातावरणावर या परिषदेतून मोठे संकेत मिळण्याची शक्यता आहे.
————————————————————————————–