मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेने मध्ये युती झाली असून, ही युती दलित-मराठी मतांचे समीकरण बदलवणारी ठरण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने एकत्रित पत्रकार परिषद घेत, एकनाथ शिंदे यांनी ही युती अधिकृतपणे जाहीर केली.
बाळासाहेबांचा वारसा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – आज आपल्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे. शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही सेना रस्त्यावर अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या आहेत. एक बाळासाहेबांचा वारसा घेऊन चालणारी सेना, तर दुसरी बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा वारसा असलेली सेना आहे. त्यामुळे आमचं एकदम चांगलं जमेल,” असं सांगत शिंदेंनी दोन्ही पक्षांच्या समानतेचा दाखला दिला.
त्यांनी पुढे म्हटलं की, “मी आणि आनंदराज आंबेडकर दोघंही मुख्यमंत्री होण्याआधी कार्यकर्ते म्हणून काम करत होतो. ‘सीएम’ म्हणजे ‘कॉमन मॅन’, आणि आता मी ‘डीसीएम’ म्हणजे ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ आहे. कारण तळागाळातील माणूस आणि कार्यकर्ता हीच आपली खरी सामाजिक बांधिलकी आहे.”
शिवशक्ती आणि भीमशक्ती
एकनाथ शिंदे यांनी आनंदराज आंबेडकरांच्या साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचंही कौतुक केलं. “ते परदेशात जाऊन शिकलेले, पण भारतीय संस्कृतीशी नाळ जोडलेले आहेत. सत्ता ही जनतेसाठी असते, तिचा उपयोग लोकसेवेसाठी व्हायला हवा,” असं सांगत त्यांनी रिपब्लिकन सेनेच्या भूमिकेला सन्मान दिला.
“शिवशक्ती आणि भीमशक्ती या दोन्ही सेना कार्यकर्त्यांची फौज आहेत. ना तिकडे मालक, ना इकडे नोकर. दोन्ही ठिकाणी कार्यकर्तेच मालक आहेत,” असे उद्गार शिंदेंनी काढले.
कार्यकर्ता मोठा झाला, तर पक्ष मोठा होतो
शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आठवत, म्हटलं की, “बाळासाहेब नेहमी म्हणायचे की, सहकाऱ्यांना सवंगडी समजा. पण काही लोक त्यांना घरगडी समजू लागले आणि तिथेच गाडी फसली. कार्यकर्ता मजबूत असला की पक्ष मोठा होतो. आता आम्ही एकत्र आलो आहोत, त्यामुळे हा कार्यकर्ता नेत्याला मोठं करेल आणि पक्ष सर्व निवडणुका जिंकेल.”
या युतीमुळे आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दलित मतांचा महत्त्वाचा आधार मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, पुणे आणि कोकण परिसरात याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. रिपब्लिकन सेना व शिवसेना शिंदे गटाची ही युती केवळ निवडणुकीपूरती मर्यादित न राहता, सामाजिक-सांस्कृतिक एकात्मतेचंही प्रतीक ठरण्याची शक्यता आहे. शिवशक्ती आणि भीमशक्तीचा हा संगम महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरण निर्माण करणार, यात शंका नाही.
——————————————————————————————