कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
मे महिन्याच्या अखेरीस भारत सरकारने महागाई कमी करण्यासाठी आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी कस्टम ड्युटीमध्ये लक्षणीय कपात जाहीर केली आहे. केंद्र सरकारने कच्चे पाम तेल, कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेलावरील मूलभूत कस्टम ड्युटी निम्म्याने कमी केली आहे.
याआधी स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलांवर २० टक्के ड्युटी आकारली जायची, जी आता १० टक्क्यांनी कमी केली गेली आहे. हा बदल आजपासून लागू झाला असून खाद्यतेलावरील कस्टम ड्युटीमधील ही कपात पुढील एका वर्षासाठी असेल.
खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी झाले
भारत आपल्या देशांतर्गत खाद्यतेलाच्या गरजेच्या ५० टक्केहून अधिक आयात करतो. शुक्रवारी या संदर्भात एक अधिसूचना जारी करण्यात आली आणि तात्काळ लागू झाली आहे. अशाप्रकारे कच्चे पाम तेल, कच्चे सोयाबीन आणि कच्चे सूर्यफूल तेलावरील प्रभावी आयात शुल्क (मूलभूत सीमा शुल्क आणि इतर शुल्क) आता १६.५ टक्के असेल, जे याआधी २७.५ टक्के होते. त्याचवेळी, रिफाइंड तेलांवर ३५.७५ टक्के प्रभावी शुल्क आकारले जाईल.
देशांतर्गत बाजारात सध्या पाम तेल, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत त्यामुळे, देशांतर्गत मोहरीच्या तेलाचा भावही महागला आहे. अशा स्थितीत, देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारचे हे पाऊल उचलले गेल्याचे स्पष्ट आहे. यासोबतच आयात केलेल्या खाद्यतेलांच्या आयातीतही वाढ होईल तर, खाद्यतेलाच्या किमती कमी होतील ज्यामुळे महागाई नियंत्रणात येण्यास मदत होऊ शकेल. गेल्या वर्षी १४ सप्टेंबर रोजी सरकारने कच्च्या सोयाबीन तेल, कच्च्या पाम तेल आणि कच्च्या सूर्यफूल तेलावरील मूलभूत सीमाशुल्क ० टक्क्यांवरून २० टक्के पर्यंत वाढवले होते, ज्यामुळे कच्च्या तेलांवरील प्रभावी शुल्क २७.५ टक्क्यांपर्यंत वाढले होते.
दोन देशांकडून पाम तेलाचा आयात
भारत रिफाइंड पाम तेलाची आयात जास्त करतो कारण ते कच्च्या पाम तेलापेक्षा स्वस्त असते. मलेशिया आणि इंडोनेशियामधून भारत पाम तेलाचे सर्वाधिक आयात करतो.