अर्थशास्त्राला स्वतंत्र शास्त्र म्हणून ओळख देणारा अर्थशास्त्रज्ञ : अ‍ॅडम स्मिथ

0
217
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क

अ‍ॅडम स्मिथ यांनी अर्थशास्त्राला एक स्वतंत्र शास्त्र म्हणून ओळख दिली आणि त्याच्या अध्ययनासाठी तात्त्विक व वैज्ञानिक पाया दिला. त्यांच्या विचारांनी पुढे संपूर्ण आर्थिक धोरणांची दिशा ठरवली. म्हणूनच त्यांना “आधुनिक अर्थशास्त्राचे जनक” म्हणतात. स्मिथ यांनी मांडलेली अदृश्य हात – Invisible Hand ही संकल्पना खूप प्रसिद्ध आहे. त्यांच्या मते, जेव्हा व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी कार्य करतो, तेव्हा तो नकळतपणे समाजाच्या एकूण हितासाठी योगदान देतो. ही कल्पना मुक्त बाजार व्यवस्थेच्या समर्थनासाठी वापरली जाते. सध्या जग ही एक मुक्त बाजारपेठ बनली आहे, हा विचार स्मिथ यांनी १८ व्या शतकात मांडला होता. आज अ‍ॅडम स्मिथ यांचा जन्मदिवस यानिमित्त त्यांच्या कार्याविषयी…

अ‍ॅडम स्मिथ यांची जडणघडण १८व्या शतकात स्कॉटलंडमध्ये झाली. त्यांच्या वैचारिक व बौद्धिक विकासावर त्या काळातील सामाजिक, राजकीय व बौद्धिक वातावरणाचा मोठा प्रभाव होता. अ‍ॅडम स्मिथ यांचा जन्म १६ जून १७२३ रोजी स्कॉटलंडमधील कर्कॉल्डी या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे लवकरच निधन झाल्यामुळे त्यांचे पालनपोषण आईने केले. त्यांनी ग्लासगो विद्यापीठात शिक्षण घेतले. तिथे ते नैतिक तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र शिकले. पुढे त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले, परंतु तिथले शिक्षण थोडे जुने आणि कठोर असल्याचे त्यांना वाटले. ग्लासगो विद्यापीठात फ्रान्सिस हचिसन या तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकांचा प्रभाव त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पडला. 

हचिसन हे नैतिक भावना व स्वाभाविक हक्कांवर भर देणारे विचारवंत होते. त्यांनी डेव्हिड ह्यूम या तत्त्ववेत्त्याशी मैत्री केली. ह्यूमचे अनुभववाद आणि स्वभावाधिष्ठित तत्त्वज्ञान अ‍ॅडम स्मिथच्या विचारांवर खोलवर परिणाम करणारे ठरले. त्यांनी काही काळ फ्रान्समध्ये वास्तव्य केले, जिथे त्यांनी फिजिओक्रॅट या आर्थिक विचारवंतांच्या गटाशी संवाद साधला. यामध्ये फ्रँकोइस क्युने व टर्गो यांचे विचार त्यांच्यावर प्रभावी ठरले. त्यांनी बाजारपेठेतील नैसर्गिक सुव्यवस्था (natural order) आणि “लेसे फेअर” या कल्पनांचा स्वीकार केला. अ‍ॅडम स्मिथ औद्योगिक क्रांतीच्या उगम काळात अधिक सक्रीय होते. त्यामुळे व्यापार, बाजारपेठा, उत्पादन पद्धती, श्रम विभागणी (division of labour) यांचे निरीक्षण करून त्यांनी त्यांच्या आर्थिक विचारांची मांडणी केली.

अ‍ॅडम स्मिथ यांनी १७७६ साली लिहिलेले पुस्तक “An Inquiry into the Nature and Causes of the Wealth of Nations” हे आधुनिक अर्थशास्त्राचा पाया मानले जाते. या ग्रंथात त्यांनी अर्थव्यवस्थेचे कार्य, बाजार व्यवस्थेचे सिद्धांत, आणि संपत्ती निर्मितीची तत्वे स्पष्ट केली.

‘अदृश्य हात’ (Invisible Hand) : अ‍ॅडम स्मिथ यांनी मांडलेली अदृश्य हात – Invisible Hand ही संकल्पना खूप प्रसिद्ध आहे. त्यांच्या मते, जेव्हा व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी कार्य करतो, तेव्हा तो नकळतपणे समाजाच्या एकूण हितासाठी योगदान देतो. ही कल्पना मुक्त बाजार व्यवस्थेच्या समर्थनासाठी वापरली जाते. स्मिथ यांनी सांगितले की, व्यक्ती स्वार्थामुळे प्रेरित होतो, पण हेच बाजारात स्पर्धा निर्माण करते आणि त्यामुळे उत्पादने उत्तम गुणवत्तेची व योग्य किमतीत उपलब्ध होतात. त्यांनी सरकारने बाजारात कमीतकमी हस्तक्षेप करावा – Laissez-faire या धोरणाचे समर्थन केले.
कामाचे विभाजन (Division of Labour) : अ‍ॅडम स्मिथ यांनी कामाचे विभाजन – Division of Labour चा सैद्धांतिक पाया मांडला. त्यांनी उदाहरण दिले की, एक सुई बनवणाऱ्या कारखान्यात वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या टप्प्यावर काम केल्यास उत्पादनक्षमता लक्षणीयरीत्या वाढते.
मूल्य व श्रम सिद्धांत (Labour Theory of Value) : त्यांच्या मते, कोणत्याही वस्तूचे मूल्य हे तिच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या श्रमावर आधारित असते. हा सिद्धांत नंतरच्या अर्थशास्त्रज्ञांनी विस्तृतपणे चर्चिला.
साहित्यिक कार्य : अ‍ॅडम स्मिथ यांनी १७५९ मध्ये त्यांनी “The Theory of Moral Sentiments” हे पुस्तक लिहिले, ज्यात त्यांनी सहवेदना (sympathy) आणि नैतिक भावना यांवर भर दिला. १७७६ मध्ये त्यांनी आपले प्रसिद्ध पुस्तक “An Inquiry into the Nature and Causes of the Wealth of Nations” प्रकाशित केले. याच ग्रंथामुळे त्यांना “Father of Economics” म्हणतात..

अ‍ॅडम स्मिथ हे केवळ एक अर्थशास्त्रज्ञ नव्हते, तर एक द्रष्टे विचारवंत होते. त्यांनी मानवी वर्तन, नैतिकता आणि अर्थव्यवस्थेतील तत्त्वांचा सखोल अभ्यास करून एक अशी प्रणाली मांडली, जिच्यावर आजचे आधुनिक आर्थिक धोरण आधारित आहे. त्यांची कार्ये आजही तितकीच सुसंगत आणि मार्गदर्शक ठरतात.


Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here