spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeअध्यात्मकोल्हापुरात पर्यावरणपूरक गणेश विसर्जन

कोल्हापुरात पर्यावरणपूरक गणेश विसर्जन

जिल्हा परिषद आणि महापालिकेची व्यापक तयारी

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

जिल्ह्यातील गणेश विसर्जन यंदा अधिक पर्यावरण पूरक पद्धतीने पार पडावे यासाठी जिल्हा परिषद आणि महापालिकेने संयुक्तपणे व्यापक नियोजन केले आहे. ग्रामपंचायतींपासून ते शहरातील प्रभागांपर्यंत पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

ग्रामीण भागात जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींनी विसर्जनासाठी स्वतंत्र नियोजन केले असून १२१६ ट्रॅक्टर, १००३ काहिली, ११२२ जुन्या विहिरी व खाणींची व्यवस्था करण्यात आली आहे. ५२ गावांमध्ये ‘ एक गाव, एक गणपती ’ योजना राबवली जात आहे. या शिवाय मूर्ती परत घेण्यासाठी ११२ कुंभार बांधवांची निश्चिती झाली आहे. निर्माल्य व्यवस्थापनासाठी २२९ घंटागाड्या आणि खत निर्मिती तसेच अंतिम व्यवस्थापनासाठी १०९१ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या उपक्रमात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत असून नदी-नाल्यांचे पाणी दूषित होऊ नये म्हणून ग्रामस्थ स्वतःहून काहिलीत विसर्जन करण्यास पुढाकार घेत आहेत.
शहर भागात महापालिकेकडून सर्व प्रभागांमध्ये १६० कृत्रिम विसर्जन कुंड उभारले आहेत. घरगुती गौरी-गणपती विसर्जनासाठी अडीच हजारांहून अधिक कर्मचारी तैनात राहणार आहेत. यासाठी २०५ टेम्पो, ४८० हमाल, सात जेसीबी, सात डंपर, आठ ट्रॅक्टर, चार टँकर, दोन बुम, पाच रुग्णवाहिका, पाच साधे व दहा फ्लोटिंग तराफे तैनात ठेवण्यात आले आहेत. यंदा पहिल्यांदाच विसर्जनासाठी एक अतिरिक्त क्रेन उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे इराणी खण येथे मूर्ती विसर्जनासाठी स्वयंचलित यंत्र बसवण्यात आले असून अग्निशमन दलाचे जवान सुरक्षा व्यवस्थेसाठी सज्ज असतील. विद्युत विभागाकडून ठिकठिकाणी प्रकाश योजना केली आहे तर आरोग्य निरीक्षकांची १३ पथके स्वच्छतेसाठी कार्यरत राहणार आहेत. विसर्जन ठिकाणी सीसीटीव्ही देखील बसवण्यात आले आहेत.

निर्माल्य संकलन करून पुईखडी, बापट कॅम्प, कसबा बावडा, दुधाळी, आयसोलेशन हॉस्पिटल परिसरात खतनिर्मिती केली जाणार आहे. या कामात अवनी, एकटी, वसुंधरा यांसारख्या संस्थांमधील १५० महिला सहभागी होणार आहेत.

दरम्यान, पंचगंगा नदी तसेच परिसरातील तलावांमध्ये गणेश व गौरी विसर्जनास सक्त मनाई करण्यात आली आहे. भक्तांनी महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम कुंडांचा वापर करावा, असे प्रशासनाचे आवाहन आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या या प्रयत्नांमुळे यंदाचे विसर्जन अधिक पर्यावरणपूरक व सुरक्षित होणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.
———————————————————————————————————————
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments