पुणे : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यातील मुलींना उच्च शिक्षण घेताना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू नये, तसेच उच्च शिक्षणात त्यांचे प्रमाण वाढावे, यासाठी शिक्षण विभागाकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘ कमवा आणि शिका ’ या योजनेची घोषणा केली असून, योजनेचा आराखडा सध्या तयार केला जात आहे.
या योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना शिक्षण घेत असतानाच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ज्या विद्यार्थिनींनी या उपक्रमांतर्गत काम केले, त्यांच्या खात्यात दरमहा दोन हजार रुपये जमा केले जातील. या रकमेच्या मदतीने मुलींना शैक्षणिक साहित्य खरेदी करणे किंवा दैनंदिन खर्च भागवणे सोपे होणार आहे.
यापूर्वीच उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मुलींसाठी ८४२ अभ्यासक्रमांमध्ये शंभर टक्के शिक्षण शुल्कमाफी दिली होती. त्यानंतर विद्यार्थिनींना महिन्याला सहा हजार रुपयांचा निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा भत्ता मुलींना राहण्याची व जेवणाची सोय करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. मात्र दैनंदिन खर्च, वह्या-पुस्तकं, शैक्षणिक साहित्य यासाठी स्वतंत्र मदतीची गरज असल्याने ‘कमवा आणि शिका’ योजना सुरू करण्याचे ठरवण्यात आले आहे.
या योजनेसाठी प्रत्येक महाविद्यालय आपल्या विद्यार्थिनींना लहानमोठ्या रोजगाराच्या संधी निर्माण करून देणार आहे. अशा विद्यार्थिनींची यादी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे पाठवली जाणार आहे. सुरुवातीला या योजनेचा लाभ ५ लाख विद्यार्थिनींना देण्याचा मानस असून, त्यासाठी दरमहा १०० कोटी रुपये, तर वर्षभरासाठी तब्बल १००० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
या निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्याची सध्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता निधी मंजूर होण्यास काहीसा वेळ लागू शकतो, मात्र तोपर्यंत या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातील इतर बाबींवर विभाग काम करणार आहे.
यासोबतच, सिडनहॅम महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी व आशियातील वाणिज्य शाखेतील पहिल्या महिला पदवीधर यास्मिन सर्वेअर यांच्या पदवीदानाला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पाटील यांनी या नव्या योजनेची माहिती दिली आणि मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना देण्यासाठी विभाग कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.
——————————————————————————————-