spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeपर्यटनवाहतूक पोलिसांच्या खासगी मोबाईलवरील फोटोला लगाम

वाहतूक पोलिसांच्या खासगी मोबाईलवरील फोटोला लगाम

वाहतूक विभागाचा नवा आदेश

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

वाहतूक पोलिसांकडून त्यांच्या खासगी मोबाईलवर वाहनांचे फोटो काढून नंतर सवडीने ई-चलन पाठवण्याच्या पद्धतीला अखेर लगाम बसणार आहे. नियमांमध्ये बसत नसलेल्या या पद्धती विरोधात वाहनचालक आणि वाहतूक संघटनांनी जोरदार आक्षेप नोंदवल्यानंतर वाहतूक विभागाने नव्या आदेशांची अंमलबजावणी सुरू केली आहे.

खरं तर पोलिसांना आधीपासूनच अधिकृत ई-चलन यंत्रणा देण्यात आलेली आहे. तरीही अनेक पोलिस कर्मचारी आपल्या खासगी मोबाईलमधून एकाच वेळी अनेक वाहनांचे फोटो काढतात आणि नंतर वेळ मिळेल तसे त्यांना अपलोड करून वाहनचालकांना ई-चलन पाठवतात. ही कृती केवळ नियमबाह्य नसून पारदर्शकतेच्या दृष्टीनेही संशयास्पद ठरत होती.
या प्रकाराबाबत प्रखर नाराजी नुकत्याच पार पडलेल्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत विविध वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली होती. कठोर शब्दांत व्यक्त झालेल्या या आक्षेपांची दखल घेऊन अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंखे यांनी नव्या आदेशाद्वारे या प्रकारावर बंदी घातली आहे.

नवा आदेश

  • यापुढे कोणताही वाहतूक पोलीस खासगी मोबाईलवर फोटो काढून चलन पाठवू शकणार नाही.
  • फक्त अधिकृत ई-चलन यंत्रणेद्वारेच फोटो काढून कारवाई करता येईल.
  • आदेशांचं काटेकोर पालन न करणाऱ्या पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.
या एकतर्फी कारवाईमुळे अनेक सजग वाहनचालक आणि पोलिसांमध्ये वेळोवेळी वाद झाल्याची उदाहरणं आहेत. एकाच वेळी अनेक फोटो काढून, त्यानंतर सवडीने चलन पाठवण्याची पद्धत ही वाहनचालकांच्या दृष्टीने अन्यायकारक ठरत होती. आता नव्या आदेशामुळे असे वाद टाळता येणार आहेत.

वाहतूक कायदे पाळणं जितकं नागरिकांचं कर्तव्य आहे, तितकंच पोलिसांनीही कायद्याच्या चौकटीत राहून पारदर्शक पद्धतीनं काम करणं अपेक्षित आहे. वाहतूक विभागाच्या या निर्णयामुळे वाहनचालकांमध्ये विश्वास निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे. आता नव्या आदेशांचं प्रत्यक्षात किती पालन होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

——————————————————————————————–

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments