एआय व फेस आयडीचा वापर
UIDAI या अॅपमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आणि फेस आयडी तंत्रज्ञानाचा वापर करत आहे, ज्यामुळे आधार अपडेट प्रक्रियेतील सुरक्षितता आणि विश्वासार्हता वाढणार आहे. नोव्हेंबर २०२५ पासून केवळ बायोमेट्रिक प्रमाणीकरणसाठी जसे की फिंगरप्रिंट किंवा आयरिस स्कॅनिंग नावनोंदणी केंद्रांना भेट देणे आवश्यक असेल. मात्र, इतर सर्व अपडेट्स मोबाईल अॅपवरून करता येतील.
सरकारी दस्तऐवजांची डिजिटल पडताळणी
UIDAI च्या या पुढाकाराचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे, सत्यापित सरकारी स्त्रोतांकडून आवश्यक माहिती स्वयंचलितपणे प्राप्त करण्याची योजना. या प्रणालीमध्ये जन्म प्रमाणपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, मनरेगा योजनेचे रेकॉर्ड आणि अगदी वीज बिलाच्या आधारे पत्ता पडताळणीचा समावेश केला जाणार आहे. यामुळे नागरिकांना अनेक कागदपत्रं अपलोड करण्याची गरज राहणार नाही आणि प्रक्रियाही अधिक गतीने पार पडणार आहे.
आधार गव्हर्नंस पोर्टल
या व्यतिरिक्त, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) ‘आधार सुशासन पोर्टल’ सुरू केले आहे. या पोर्टलचा उद्देश आधार पडताळणी विनंत्यांची प्रक्रिया सोपी, जलद आणि पारदर्शक बनवणे आहे. हे पोर्टल आधारशी संबंधित सेवांची कार्यक्षमता आणि वापरकर्ता अनुकूलता वाढवण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. पडताळणीसाठी अर्ज सादर करणे आणि त्याचे मंजुरीकरण अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा आहे.
एकूणच, UIDAI कडून विकसित होत असलेले हे मोबाईल अॅप आणि गव्हर्नंस पोर्टल नागरिकांसाठी एक सशक्त डिजिटल पाऊल ठरणार आहे. आधार सेवा आता अधिक सुरक्षित, सुलभ आणि स्मार्टफोनवर एका क्लिकवर उपलब्ध होणार असून, देशभरातील कोट्यवधी नागरिक याचा लाभ घेणार आहेत. UIDAI लवकरच या नव्या अॅपबाबत अधिकृत घोषणा करेल, अशी शक्यता आहे.
—————————————————————————————————–