कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
गेले दोन दिवस आणि आज रिमझिम पाऊस, ढगाळ वातावरण, मध्येच उन्हाचा कवडसा असे हवामान आहे. पाऊस सलग आठवडा सुरु असला तरी गेल्या सव्वा महिन्यात जसा पाऊस पडत होता तितका जोराचा आणि सलग नाही यामुळे महापुराची भीती आता राहिली नाही. दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवात पाऊस असतो, यावर्षीही आहे. हवामान विभागाने कोल्हापूरला येलो अलर्ट दिला आहे.
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर ओसरेल. मात्र कोकण आणि घाटमाथ्याचं क्षेत्र इथं अपवाद ठरणार आहे. हवामान विभागाच्या मुंबई शाखेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासांमध्ये दक्षिण कोकणापासून गोव्यापर्यंत पावसाचा जोर वाढणार असून, दक्षिण मध्य महाराष्ट्रातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर कोकणामध्ये ताशी ३० ते ४० किमी वेगानं वारे वाहणार असून या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची हजेरी असेल.
राज्यात पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रामुख्यानं कोकणातील रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरचा घाटमाथा, अकोला, अमरातवी, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, वर्धा, नागपूर, गडचिरोली इथं पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई शहर आणि उपरिमझिम,नगरांमध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरीही काही भागांमध्ये अधूनमधून येणारी एखादी सर जोराची येते. पुढील काही दिवसांत धीम्या गतीनं पावसाचा जोर तुलनेनं कमी होईल. सप्टेंबमध्ये मात्र पाऊस पुन्हा जोर धरताना दिसेल.
केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार भारतात सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात पाऊस सरासरीच्या १०९ टक्क्यांहून अधिक असण्याची शक्यता आहे. या काळात बहुतांश प्रदेशांत सामान्य ते सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल तर ईशान्य आणि पूर्व भारतातील काही भाग, दक्षिणेकडील काही राज्य, उत्तर-पश्चिम भारतातील काही ठिकाणी राज्यांमध्ये मात्र पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल.



