प्रसारमाध्यम प्रतिनिधी :
विमान चालवण्याचं करिअर हे आजही तरुणांमध्ये आकर्षणाचं केंद्र आहे. मात्र पायलट होण्यासाठी नेमकी कोणती पात्रता लागते, ट्रेनिंगचा खर्च किती येतो आणि पगार किती मिळतो, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो.
पात्रता, प्रशिक्षण, खर्च आणि पगाराची सविस्तर माहिती
भारतातील हवाई वाहतूक क्षेत्र झपाट्याने विस्तारत असून, हे क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनत चाललं आहे. सध्या या क्षेत्राचा देशाच्या अर्थव्यवस्थेतील वाटा सुमारे 53.6 अब्ज अमेरिकी डॉलर इतका असून, 75 लाखांहून अधिक लोकांना यामधून थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळत आहे. वाढत्या प्रवासी संख्येमुळे आणि नवीन विमानतळ, एअरलाईन्स सुरू झाल्यामुळे पायलटसाठी मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होत आहेत.
पायलटचे प्रकार
Commercial Pilot (CPL) ; प्रवासी विमान, एअरलाईनमध्ये नोकरी
Private Pilot (PPL);वैयक्तिक वापर
Helicopter Pilot ;एअर अँब्युलन्स, बचावकार्य
Cargo / Charter Pilot ; मालवाहतूक, खासगी विमान
पायलट होण्यासाठी पात्रता काय ?
पायलट होण्यासाठी उमेदवाराचं वय किमान 18 वर्षे असणं आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेबाबत बोलायचं झाल्यास, उमेदवाराने 12वी सायन्स शाखेतून भौतिकशास्त्र (Physics) आणि गणित (Mathematics) या विषयांसह उत्तीर्ण झालेलं असावं. किमान 50 टक्के गुण अपेक्षित असतात.
कॉमर्स किंवा आर्ट्स शाखेतील विद्यार्थ्यांनाही पायलट होता येतं, मात्र त्यासाठी त्यांना NIOS किंवा स्टेट ओपन बोर्डमार्फत Physics आणि Maths विषयांची परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक असतं.
वैद्यकीय तपासणी – अत्यंत महत्त्वाचा टप्पा
पायलट होण्यासाठी आरोग्य उत्तम असणं अनिवार्य आहे. यासाठी DGCA (डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) कडून मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी केली जाते.
प्रथम Class 2 मेडिकल प्रमाणपत्र घ्यावं लागतं. त्यानंतर कमर्शियल पायलट लायसन्स (CPL) साठी Class 1 मेडिकल फिटनेस आवश्यक असतो. या तपासणीत डोळ्यांची दृष्टी, हृदय, रक्तदाब, ईसीजी, रक्त व लघवी तपासणी, नाक-कान-गळ्याची तपासणी केली जाते.
कलर ब्लाइंडनेस असलेल्या उमेदवारांना पायलट होता येत नाही.
पायलट ट्रेनिंगची प्रक्रिया
Step 1: Student Pilot License (SPL)
-
लेखी परीक्षा
-
मेडिकल फिटनेस
Step 2: Ground Classes
विषय:
-
Air Navigation
-
Meteorology (हवामानशास्त्र)
-
Air Regulations
-
Aircraft Technical Knowledge
Step 3: Flying Training
-
किमान 200 तासांचे उड्डाण
-
Solo Flying
-
Cross-country Flying
Step 4: Commercial Pilot License (CPL)
-
DGCA (भारत) कडून लायसन्स
-
एअरलाईनमध्ये नोकरीस पात्र सविस्तर पाहू.
पायलट ट्रेनिंग दोन प्रमुख टप्प्यांत पूर्ण होते — ग्राउंड ट्रेनिंग आणि फ्लाइंग ट्रेनिंग.
ग्राउंड ट्रेनिंगमध्ये एअर रेग्युलेशन्स, मेटिओरोलॉजी (हवामानशास्त्र), एअर नेव्हिगेशन, रेडिओ टेलिफोनी आणि टेक्निकल विषय शिकवले जातात. या विषयांच्या लेखी परीक्षेत किमान 70 टक्के गुण मिळवणं आवश्यक असतं.
यानंतर उमेदवारांना DGCA मान्यताप्राप्त फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (FTO) मध्ये दाखल व्हावं लागतं. येथे किमान 200 तासांचं विमान उड्डाण प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कमर्शियल पायलट लायसन्स (CPL) मिळतो.
कॅडेट पायलट प्रोग्रॅम – दुसरा मार्ग
आजकाल अनेक एअरलाईन्स कंपन्या स्वतःचे कॅडेट पायलट प्रोग्रॅम चालवतात. या प्रोग्रॅमअंतर्गत 12वी नंतर विद्यार्थ्यांची निवड केली जाते. निश्चित अभ्यासक्रम, थ्योरी आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग, तसेच पुढे टाइप रेटिंग दिलं जातं. मात्र या मार्गाचा खर्च तुलनेने जास्त असतो.
प्रशिक्षणाचा खर्च किती?
पायलट ट्रेनिंग हा खर्चिक टप्पा मानला जातो.
-
भारतात: अंदाजे ₹35 ते ₹55 लाख
-
अमेरिका / कॅनडा: ₹45 ते ₹70 लाख
-
दक्षिण आफ्रिका: ₹35 ते ₹40 लाख
या खर्चात फ्लाइंग तास, ग्राउंड क्लासेस, परीक्षा फी, मेडिकल आणि लायसन्स फी यांचा समावेश असतो. अनेक विद्यार्थी यासाठी शैक्षणिक कर्जाचा पर्याय निवडतात.
पायलटचा पगार किती मिळतो?
पगाराबाबत बोलायचं झाल्यास, भारतात एअरलाईनमध्ये नव्याने रुजू झालेल्या फर्स्ट ऑफिसरला दरमहा ₹2.5 ते ₹4 लाख पगार मिळतो. अनुभव वाढल्यानंतर आणि कॅप्टन पदावर पदोन्नती झाल्यावर हा पगार ₹6 ते ₹10 लाखांपर्यंत जातो.
आंतरराष्ट्रीय एअरलाईन्समध्ये काम करणाऱ्या पायलटला याहून अधिक, म्हणजे ₹8 ते ₹15 लाखांहून अधिक मासिक पगार मिळू शकतो.
करिअरच्या संधी आणि भविष्य
विमानवाहतूक क्षेत्राच्या झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे भविष्यात पायलटची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. एअरलाईन पायलट व्यतिरिक्त, पायलट ट्रेनर, फ्लाइट इन्स्ट्रक्टर, चार्टर किंवा कार्गो पायलट म्हणूनही करिअरच्या संधी उपलब्ध आहेत.
पायलट होणं हे स्वप्नवत, प्रतिष्ठित आणि उच्च पगाराचं करिअर असलं तरी त्यासाठी मेहनत, शिस्त, उत्तम आरोग्य आणि भक्कम आर्थिक नियोजन आवश्यक आहे. योग्य मार्गदर्शन आणि चिकाटीच्या जोरावर हे स्वप्न नक्कीच साकार होऊ शकतं.






