कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
सध्या महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेवरून वादळ उठले असतानाच, संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर मराठी भाषेची प्रखर गर्जना घडवून आणत, डॉ. वर्षा देशपांडे यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला अभिमानाने भरून टाकलं आहे. विदर्भाची कन्या आणि साताऱ्याची सून असलेल्या डॉ. देशपांडे यांना ‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन अवॉर्ड २०२४’ या प्रतिष्ठित जागतिक पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. इंदिरा गांधी आणि जमशेदजी टाटा यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या तिसऱ्या भारतीय ठरल्या आहेत.
लोकसंख्या आणि प्रजनन आरोग्य क्षेत्रात तीन दशकांहून अधिक काळ झगडत त्यांनी केलेल्या योगदानाची दखल घेत तब्बल ३३ वर्षांनंतर हा पुरस्कार भारताला मिळालेला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये आयोजित भव्य समारंभात हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला.
या सन्मान स्वीकारताना डॉ. देशपांडे यांनी आपल्या भाषणासाठी इंग्रजीऐवजी मातृभाषा ‘मराठी’ निवडली. हे दृश्य पाहून संपूर्ण मराठी समाजाचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.
त्यांनी भाषणाची सुरुवात करताना ठामपणे सांगितलं,
“मी इंग्रजीतून बोलू शकते, पण एक महिला म्हणून जेव्हा मी या क्षेत्रात कार्य करते, तेव्हा माझी मातृभाषा मराठीच असते. या भाषेचा आदर संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर व्हावा म्हणून मी मराठीत बोलते आहे.”
डॉ. देशपांडे यांनी स्पष्ट केलं की, हा सन्मान केवळ त्यांच्यासाठी नाही, तर तो संपूर्ण भारतातील, महाराष्ट्रातील, आणि जगभरात लोकांसाठी संघर्ष करणाऱ्या संस्था आणि कार्यकर्त्यांसाठी आहे.
त्या पुढे म्हणाल्या, “संयुक्त राष्ट्रांनी जपलेली मूल्यं – मानवी प्रतिष्ठा, उपेक्षित आणि असुरक्षित लोकांचे हक्क – यासाठी मी कायम त्यांच्या सोबत राहण्याची ग्वाही देते. आज वर्ल्ड पॉप्युलेशन डे साजरा करत असताना आपण सर्वांनी मिळून एक असं भविष्य घडवावं, जे मानवी हक्कांचं संरक्षण करणारं, स्त्री-पुरुष समतेला मानणाऱं आणि अहिंसेच्या मार्गाने शांततेचा अनुभव देणारं असेल. आपल्या भावी पिढ्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी माझं आजचं पाऊल महत्त्वाचं आहे. हा पुरस्कार मला ऊर्जा देईल आणि अधिक झोकून देऊन काम करण्याची प्रेरणा मिळवून देईल. मी तो नम्रतापूर्वक स्वीकारते.”
या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. लाखो लोकांनी त्यावर अभिप्राय दिला असून, “मराठीची गर्जना आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली!”, “हे खरं मराठी बाणेदारपण!”, अशा भावना व्यक्त होत आहेत. डॉ. वर्षा देशपांडे यांच्या या ऐतिहासिक सन्मानामुळे महाराष्ट्राचा आणि भारताचा झेंडा संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर मोठ्या अभिमानाने फडकला आहे.