Dr. Abhay Bang and Dr. Rani Bang, founders of the ‘Search’ organization in Gadchiroli, have been conferred with the global honor of ‘Goalkeepers Champions’ by Bill Gates’ Gates Foundation.
गडचिरोली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
ग्रामीण भागातील सार्वजनिक आरोग्य आणि विशेषत: बालमृत्यू रोखण्यासाठी कल्पक उपाययोजना राबवल्याबद्दल गडचिरोलीतील ‘सर्च’ संस्थेचे संस्थापक डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांना बिल गेट्स यांच्या गेट्स फाऊंडेशनतर्फे ‘गोलकिपर्स चॅम्पियन्स’ हा जागतिक सन्मान जाहीर झाला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे झालेल्या समारंभात ‘सर्च’चे सहसंचालक डॉ. आनंद बंग यांनी संस्थेच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.
गेट्स फाऊंडेशन दरवर्षी गोलकिपर्स इव्हेंट हा कार्यक्रम आयोजित करते. यावर्षीच्या कार्यक्रमात बिल गेट्स यांनी २०४५ पर्यंत जगभरातील लाखो बालकांचे जीव वाचवण्याचा संकल्प जाहीर केला. ते म्हणाले, “ २०४५ पर्यंत बालमृत्यू रोखणे आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या जीवघेण्या आजारांना नष्ट करणे ही मानवतेपुढील मोठी जबाबदारी आहे. आरोग्य सुविधांसाठीचा निधी कमी करायचा की मुलांना त्यांचा हक्काचा निरोगी आयुष्य द्यायचे, यावर पुढील पिढीचे भवितव्य ठरणार आहे.” त्यांनी यावेळी सांगितले की, “२००० मध्ये जगभरात दरवर्षी १० लाख बालमृत्यू होत असत, आता हे प्रमाण ५ लाखांवर आले आहे. मात्र आरोग्य निधीत कपात झाली तर ही प्रगती उलट फिरू शकते.”
डॉ. अभय बंग यांचा ७५ वा वाढदिवसही मंगळवारी ( २३ सप्टेंबर ) याच दिवशी असल्याने हा सन्मान अधिकच विशेष ठरला. ‘सर्च’ ने ग्रामीण भागात नवजात बालकांची काळजी व न्यूमोनिया वरील उपचार यासाठी खेड्यातील स्त्रियांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला. यामुळे गडचिरोलीतील अर्भक मृत्यूदर १२१ वरून १६ इतका खाली आणण्यात यश आले. भारत सरकारने याच पद्धतीचा अवलंब करून २००५ मध्ये ‘आशा’ योजना सुरू केली. सध्या देशभरातील १० लाखांहून अधिक आशा सेविका दरवर्षी सुमारे दीड कोटी नवजात बालकांना आरोग्यसेवा पुरवत आहेत. डॉ. बंग यांची ही पद्धत जगभरातील ८० देशांत स्वीकारली गेली आहे.
यंदाच्या गोलकिपर्स कार्यक्रमात ‘सर्च’सह जगभरातील दहा व्यक्ती व संस्थांना गौरविण्यात आले.
१) डेव्हिड बेकहॅम (इंग्लंड) – मुलांचे आरोग्य व शिक्षण
२) क्रिस्टल म्वेसिगा बिरुंगी (युगांडा) – तरुणांचे आरोग्य धोरण
३) टोनी गार्न (जर्मनी) – मुलींचे शिक्षण व आरोग्य
४) जॉन ग्रीन (अमेरिका) – तरुणांतील टीबी व मानसिक आरोग्य संवाद
६) डॉ. डोनाल्ड कबेरुका (रवांडा) – जागतिक आरोग्य वित्त
७) जेरोप लिमो (केनिया) – एचआयव्ही जनजागृती
८) रीम अल हशिमी (यूएई) – आरोग्य व शिक्षण गुंतवणूक
९) डॉ. नवीन ठाकेर (भारत) – बालआरोग्यासाठी सामुदायिक प्रयत्न
१०) ‘सर्च’ संस्था (भारत) – बालमृत्यू रोखण्यासाठी ग्रामीण आरोग्य उपक्रम
दरम्यान, स्पेनच्या राष्ट्राध्यक्षांना याच समारंभात ‘ग्लोबल गोलकिपर’ हा सर्वात मोठा सन्मान प्रदान करण्यात आला. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील कार्य जागतिक पातळीवर पोहोचल्यामुळे डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांच्या या यशामुळे महाराष्ट्राच्या आरोग्य चळवळीचा मान जगभर उंचावला आहे.