कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
“दिलेला शब्द ना पाळणे हा अरुण डोंगळेंचा आजपर्यंतचा इतिहासच आहे”, आशा शब्दात मंत्री हसन मुश्रीफ यांनी अरुण डोंगळे यांचा समाचार घेतला आहे. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यास अरुण डोंगळे यांनी नकार दिला आहे.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोकुळ दूध संघात महायुतीचाच अध्यक्ष झाला पाहिजे, असं सांगितल्यामुळेच मी अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार नाही”, असे वक्तव्य अरुण डोंगळे यांनी काल केले होते. या संदर्भात मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी अरुण डोंगळे यांच्यावर चांगलीच आगपाखड केली.
“महायुतीचा अध्यक्ष व्हावा, अशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची इच्छा असती तर मी महायुतीचा एक महत्वाचा घटक म्हणून ते दोघेही माझ्याशी याबाबत बोलले असते”, अशी प्रतिक्रिया मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केली. “अरुण डोंगळे हे राष्ट्रवादीत आहेत मग ते अध्यक्ष पदाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे का गेले नाहीत”, असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
“गोकुळची निवडणूक महायुती म्हणून नाही तर शाहू आघाडी म्हणून लढलो होतो. अरुण डोंगळे यांना सत्तेची खुर्ची सोडवत नाही असेही त्यांनी यावेळी नमूद केले.






