spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeमनोरंजनडाॅल्बी....खरंच हवाच काय रे भाऊ..

डाॅल्बी….खरंच हवाच काय रे भाऊ..

संस्कृती व सामाजिक आरोग्य सुद्धा बिघडते

अमोल शिंगे : प्रसारमाध्यम
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील एक महत्त्वाचा सण. गणपती बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत गावागावात, गल्लीबोळात आनंदाचा जल्लोष सुरू असतो. ढोल-ताशांच्या गजरात, आरत्या, भजन, कीर्तनांमधून भक्तीभाव व्यक्त केला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांत या पारंपरिक आनंदोत्सवाला डॉल्बी संस्कृतीची जोड मिळाली आहे. भव्य स्पीकर्स, तेज आवाजात वाजणारे गाणे आणि बेसचा जोर या सर्वामुळे गणेशोत्सवात ध्वनी प्रदुर्षणाचा मुद्दा गंभीर बनला आहे. पारंपारिक वाद्यांना बगल देऊन आलेली डॉल्बी संस्कृती फक्त नागरिकांचेच नाही तर सामाजिक आरोग्य सुद्धा बिघडवत आहे.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेतील एक महत्त्वाचा उत्सव. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात लोकांना एकत्र आणण्यासाठी सुरू केलेल्या या सार्वजनिक उत्सवाचा उद्देश भक्तिभाव, एकता आणि समाजजागृती होता. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात, आरत्या, भजन, कीर्तनांच्या माध्यमातून बाप्पाची आराधना केली जायची. मात्र गेल्या दोन दशकांत या उत्सवात एक नवी ‘आकर्षणाची लाट’ आली आणि ती म्हणजे डॉल्बी संस्कृती. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि २००० च्या दशकाच्या सुरुवातीस शहरांमध्ये DJ सिस्टीम लोकप्रिय होऊ लागल्या. लग्नसमारंभ, पार्ट्या, कॉलेज फेस्टिव्हल्समधून सुरू झालेली ही संस्कृती हळूहळू गणेशोत्सवातही शिरली आणि पारंपारिक वाद्यांना पर्याय निर्माण झाला.
सुरुवातीला काही मंडळांनी मिरवणुकीत डॉल्बी वापरून ‘वेगळेपणा’ आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले. कोणत्या मंडळाचा डॉल्बी जास्त मोठा, बेस जास्त जोरात आणि गाणी जास्त लोकप्रिय अशी ग्रामीण आणि शहरी भागातील गणेशोत्सव मंडळांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आणि पारंपारिक वाद्यांना बगल देण्याला सुरुवात झाली एवढेच नाही तर स्पर्धा, इर्षा आणि वेस्टर्न संगीत यामुळे या उत्सवाचा भक्तीभाव मागे पडू लागला. तरुणाईचा कल भक्ती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मूळ उद्देशाकडून मनोरंजनाकडे झुकलेला दिसत आहे आणि हा सामाजिक आरोग्यावर झालेला एक परिणामच म्हणावा लागेल.
डॉल्बी चे आरोग्यावर होणारे परिणाम 
  • श्रवणशक्ती कमी होणे
  • मानसिक तणाव व चिडचिड
  • हृदयगती वेगाने वाढणे
  • रक्तदाब वाढणे ही लक्षणं दिसतात
  • हृदयविकाराच्या रुग्णांसाठी धोकादायक
  • झोपेचा वेळ व गुणवत्ता दोन्ही बिघडतात 
  • थकवा, कार्यक्षमता कमी होणे
  • रोगप्रतिकारशक्ती कमी होणे.
  • लहान मुलांच्या कानातील श्रवण पेशी अधिक नाजूक, कायमचा बहिरेपणा येऊ शकतो..
गणेशोत्सव काळात ध्वनी मर्यादेचे नियम न पाळल्यामुळे पोलीस विभागामार्फत तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांवर आणि डॉल्बीच्या मालकांवर गुन्हे नोंद केले जातात. एकदा का गुन्हे दखल झाले की, मग त्या तरुणांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. सन २०२४ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे पोलीस विभागाने एकूण ७७ तरुण मंडळांच्या अध्यक्षांवर आणि डॉल्बीच्या मालकांवर गुन्हे नोंद केले आहेत. यात या तरुणांवर आरोप निश्चिती झालीच तर त्याचं सामाजिक, खाजगी आयुष्य धोक्यात येऊ शकते.
डॉल्बी संस्कृती ही आधुनिक काळाची देणगी आहे, पण तिचा अतिरेक गणेशोत्सवाच्या मूळ परंपरेला बाधा आणू शकतो. परंपरा आणि आधुनिकता यांचा संतुलित संगम राखणे, हा प्रत्येक गणेशभक्ताचा आणि मंडळाचा कर्तव्य आहे. उत्सवाचा खरा गोडवा ढोल-ताशांच्या गजरात, आरत्यांच्या स्वरात आणि सामूहिक भक्तीत आहे …. डॉल्बी च्या कर्णकर्कश आवाजात नव्हे.
———————————————————————————————
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments